पाथर्डी: तालुक्यातील घुमटवाडी शिवारात कत्तलखान्याकडे तीन गायी घेऊन चाललेल्या टेम्पोचा पर्दाफाश करण्यात गोरक्षकांना यश आले. या प्रकरणी दोघांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष बाळासाहेब शिंदे (वय 26, रा. कसबा पेठ, पाथर्डी) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 20 जून रोजी रात्री एक टेम्पो घुमटवाडी येथून तीन गायी कत्तलीसाठी आष्टी तालुक्यातील धामणगाव पाण्याचे येथे नेत असल्याची माहिती मिळताच शिंदे, मिलिंद काळे, आशुतोष शर्मा, ज्ञानेश्वर सातपुते, नवनाथ सोनटक्के, आणि सुरेश पालवे यांनी खासगी वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. घुमटवाडी-चेकेवाडी रस्त्यावर त्यांनी संशयित टेम्पो थांबवून पाहणी केली असता, त्यात तीन गायी आढळून आल्या. या गायींच्या चारा, पाणी किंवा औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था नव्हती. (Latest Ahilyanagar News)
टेम्पोचालकाकडे कोणताही कायदेशीर वाहतूक परवाना आढळून आला नाही. टेम्पोचालकाने आपले नाव वसीम इस्लाम सय्यद (वय 28, रा. धामणगाव पाण्याचे, ता. आष्टी, जि. बीड) असे सांगितले. त्याने गायी गुणाजी रामसिंग चव्हाण (रा. घुमटवाडी, ता. पाथर्डी) यांच्याकडून खरेदी करून नेल्याचे कबूल केले. त्यानंतर गुणाजी चव्हाण यांना घटनास्थळी बोलवून विचारणा केली असता, त्यांनी गायी विक्रीचे कबुली दिली.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती पाथर्डी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गायी, टेम्पो आणि दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी गायींची कत्तलीसाठी बेकायदा वाहतूक व विक्री प्रकरणी वसीम इस्लाम सय्यद, गुणाजी रामसिंग चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.