नगर: पाथर्डी तालुक्यात वादळी वार्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील 222.43 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. याचा फटका 554 शेतकर्यांना बसला असल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटले. याशिवाय या तालुक्यातील नऊ घरांची पडझड देखील झाली आहे.
पाथर्डी तालुक्यात 28 ऑगस्टला पाऊस झाला. या पावसाचा फटका तिसगाव महसूल मंडलातील तीन गावे आणि टाकळी मानूर मंडलातील एक अशा चार गावांतील 22.40 हेक्टर क्षेत्रावरील तूर, टोमॅटो, बाजरी पिकांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका 51 शेतकर्यांना बसला आहे. (Latest Ahilyanagar News)
29 ऑगस्ट रोजी पाथर्डी तालुक्यात वादळी वार्यासह अतिवृष्टी झाली. या पावसाने पाथर्डी महसूल मंडलातील एका गावातील 37 हेक्टरवरील बाजरी, तूर, मुग व कापसाचे नुकसान झाले. याचा फटका 117 शेतकर्यांना बसला आहे. टाकळी मानूर मंडलातील 4 गावांना देखील अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
या चार गावांतील 163.3 हेक्टरवरील तूर, कापूस, उडीद व केळी पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका 503 शेतकर्यांना बसला आहे. एकंदरीत या तालुक्यात 222.43 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे प्राथमिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल अहवाल राज्य शासनाला पाठविला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 18 घरांची पडझड
वादळी वार्यासह झालेल्या पावसाने चार तालुक्यांतील 18 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील सर्वाधिक 9 घरांचा समावेश आहे. याशिवाय नेवासा तालुक्यातील 6, जामखेड तालुक्यातील 2 तर श्रीरामपूर तालुक्यातील 1 घराची पडझड झाली आहे.