

lजामखेड: जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीमध्ये आदिवासी भटके समाजातील जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. जामखेड ग्रामीण विकास केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेत आंबेडकर बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, आदिवासी नेते अनिल जाधव, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे नंदू मोरे, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, भटके-विमुक्तांचे नेते अंबर चव्हाण आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन कर्जत-जामखेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातील. या पुढे आपले प्रश्न आता आपल्यालाच मांडावे लागणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आपले हक्काचे विचारपीठ उपलब्ध आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील आपले प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या बाबत सरकारला जाब विचारला पाहिजेे.
मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मायक्रो ओबीसींचे 23 उमेदवार उभे केले होते. याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली. दलित आदिवासी व भटक्या-विमुक्तांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा आपण एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा खटला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः वकील म्हणून उभा राहून जिंकली. अशा अनेक लढाया आपल्याला भविष्यात लढवून त्या जिंकायचे आहेत.
यावेळी प्रा. किसन चव्हाण म्हणाले, देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, या देशातील आदिवासी आणि भटके विमुक्तांना मात्र 31 ऑगस्ट 1952 ची वाट पाहावी लागली. ज्या संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, ते संविधान अजून आदिवासी भटके भुक्तांच्या पालापर्यंत पोहोचले नाही. हे संविधान आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काम करावे लागेल.
अॅड अरुण जाधव म्हणाले, स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, आणि प्रस्थापितांची गुलामी करायची नसेल, तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब होय. तुमच्या आमच्यासारख्या रस्त्यावर लढणार्या अनेक सर्वसामान्य कुटुंबाची जबाबदारी आणि काळजी आंबेडकर घराण्याने घेतली आहे. त्यामुळे यापुढे इतर कुणाशीही पंगा घ्या, मात्र आंबेडकर घराण्याची कदापिही पंगा घेऊ नका, असा कडक इशारा त्यांनी प्रस्थापितांना दिला. यावेळी आदिवासी नेते अनिल जाधव, नंदू मोरे, भटके-विमुक्तांचे नेते अंबर चव्हाण यांचीही भाषणे झाली.
उमाताई जाधव यांनी प्रास्ताविक केले. ललिता पवार, लता सावंत, पल्लवी शेलार, रेश्मा बागवान व शितल पवार यांनी विविध ठरावांचे वाचन केले. बापू ओव्होळ, राजू शिंदे, तुकाराम पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील भटके विमुक्तांच्या संशोधन अहवालाचे वाचन केले.
महावीर मंगल कार्यालयातील विचारपीठावर सुप्रसिद्ध शाहीर शीतल साठे व सचिन माळी आणि सहकार्यांचा नवयान आंबेडकरी जलसा सादर झाला. या परिषदेमध्ये मुस्लिम पंच कमिटी, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी संघटना, प्रहार संघटना यांच्या सह समविचारी पक्ष आणि संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सकाळी 11 वाजता जामखेड तहसील कार्यालयापासून भटके मुक्तांची रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये बहुरूपी, गोसावी, उमाजी नाईक वेशभूशा, वासुदेव, मरीआईवाला, पोतराज, नंदीवाले, कुरमुडी जोशी, स्मशान जोगी, फासेपारधी, वैदू, उंटवाले, जोशी, वाघ्या मुरळी, मदारी, भोई, डोंबारी, कैकाडी आदी सहभागी झाले होते.