पारनेर: पारनेर आगारात ‘एनसीएमसी'कार्ड मिळवण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी गोरगरिब प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकार्यांनी थेट आगर प्रमुखांचे लक्ष वेधत तातडीने सुधारणेची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी ग्राहकांना सुखकर प्रवास घडवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम आणि सवलती राबवल्या जातात. याच मालिकेतील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘एनसीएमसी'कार्ड.
अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा विविध सवलत योजनांचा लाभ घेणार्यासाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या कार्डासाठी महामंडळाने १९९ रुपये शुल्क निश्चित केले आहे.
परंतु, प्रत्यक्ष कार्ड मिळवण्यासाठी आणि ते कार्यान्वित करून घेण्यासाठी अनेक प्रवाशांकडून जादाचे पैसे उकळले जात आहेत. सामान्य प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळावा, म्हणून महामंडळाने पुढाकार घेतला असला तरी, मध्यस्थांमुळे किंवा प्रक्रियेतील त्रुटींमुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी, बाळासाहेब कोकाटे, दत्तात्रय औटी मच्छिंद्र गायकवाड, सुनीता पारधे, प्रमिला मोढवे, आदींनी आगर प्रमुखांकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
प्रवाशाकडून अधिकृत शुल्कापेक्षा एक रुपयाही जास्त घेतला जाणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दोषींवर कारवाई करून पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अन्यथा ग्राहक पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.