पारनेर: पुणेवाडी येथील एका महिलेला शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गैरहजर असल्याने रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवावे लागले. रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत असून, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पारनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कार्यालयीन वेळेत उपस्थित नाहीत. त्यामुळे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकार्याां तात्पुरता उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. (Latest Ahilyanagar News)
पुणेवाडी येथील शेतकरी महिला जयश्री पुजारी या महिलेस शेतात काम करीत असताना एका घोणस जातीच्या सापाने दंश केल्याची घटना घडली आहे. या महिलेस नातेवाईकांनी स्वतःच्या वाहनाने पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, अर्ध्या तासाने ड्युटीवर असलेले ज्युनियर मेडिकल ऑफिसर त्या ठिकाणी आले. त्यांनी या रुग्णांची तत्काळ तपासणी केली असता आणि सर्पदंशची लस उपलब्ध नसल्याने या रुग्णास जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी नातेवाईकांना सल्ला दिला.
नातेवाईकांनी रुग्णांस हलविण्यासाठी रुग्णवाहिका 108 साठी संपर्क केला असता, पारनेरची 108 उपलब्ध होऊ शकत नाही आपणास टाकळी ढोकेश्वर, सुपा किंवा निघोज येथील रुग्णवाहिका अर्ध्या तासात उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.या दरम्यान उपस्थित ज्युनियर मेडिकल ऑफिसर यांनी रुग्णांना प्राथमिक उपचार सुरू केले. रुग्णास त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी या रुग्णास शिरूर येथील खासगी घेऊन गेले.
पारनेर ग्रामीण रुग्णालय 102 रुग्णवाहिका या रुग्णांस उपलब्ध होऊ शकली नाही, तर रुग्णवाहिका 108 कॉल केला असता बराच वेळ बिझी येत असल्याने ती रुग्णवाहिकही भेटली नाही. निघोज, सुपा, टाकळी ढोकेश्वर येथील 108 रुग्णवाहिका अर्धा तासाने उपलब्ध होऊ शकेल, असे वैद्यकीय अधिकार्याने सांगितले. ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार पाहता रुग्णांच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेतून या रुग्णास शिरूर येथील खासगी रुग्णालयात हलविले.
अधीक्षकांवर कारवाई करा
पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक मृणाली पाटील या कार्यालयीन वेळेमध्ये गैरहजर होत्या. त्यांच्याशी संपर्क केला असता, त्या रजेवर किंवा सुट्टीवर नसल्याचे सांगण्यात आले. मग त्या कोणत्या कारणाने अनुपस्थित होत्या. अनुपस्थितीत वैद्यकीय अधिकारी प्रिया शिरसाठ यांनी संबंधित रुग्णावर उपचार केले. परंतु जबाबदार अधिकारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असल्याने रुग्णांची हेळसांड झाली. संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.