Parner farmers protest Pudhari
अहिल्यानगर

Parner farmers protest: शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे! अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर

टाकळी ढोकेश्वरमध्ये आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पारनेर/टा. ढोकेश्वर: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वी प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या असंतोषाचा अखेर उद्रेक झाला. गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असूनही सिंगल फेज वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी (दि. 6) टाकळी ढोकेश्वर येथील उपअभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देऊन कार्यालयाला कुलूप ठोकले. या टाळेबंद आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासाठी आरडीएसएस योजनेतंर्गत महत्त्वाची वीजकामे मंजूर करण्यात आली होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना अद्याप अधिकृत वीजकनेक्शन मिळालेले नाही.

हक्काच्या विजेसाठी शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज फुटला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते. म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10:30 वाजल्यापासून शेकडो शेतकरी कार्यालयाबाहेर जमले होते.

रणरणत्या उन्हात सलग साडेतीन तास आंदोलकांनी ठिय्या मांडला. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या बांगड्यांचा आहेर अधिकाऱ्यांना सुपुर्द केला, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तत्काळ काम सुरू करा, अन्यथा कार्यालय उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा सरपंच प्रकाश गाजरे यांनी घेतला.

आंदोलनात रवींद्र राजदेव, अमोल उगले यांच्यासह सरपंच अभिजित झावरे, पांडुरंग आहेर, खंडू भाईक, कैलास सैद, प्रवीण सैद, अनिल आहेर, झांबर दरेकर, बाळासाहेब आहेर, संपत वाळुंज, विठ्ठल रोहकले, अशोक वाळुंज, शुभम काळे, दात्तराय वाळुंज, राजेंद्र दुधवडे, साहेबराव दुधवडे, संदीप गुंजाळ, काळूराम दुधवडे, लक्ष्मण कारंडे, गिरजु सूळ, लहू वाळुंज, ऋषिकेश वाळुंज, संजय पारधी, लहू भुतांबरे, विष्णू वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, साहिल वाळुंज, भागचंद वाळुंज यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

तोडगा निघेपर्यंत टाळे कायम

आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. जोपर्यंत नवीन वीज कनेक्शनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही आणि लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयाचे टाळे उघडले जाणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

‌‘त्या‌’ अधिकाऱ्याला निलंबित करा

शेतकऱ्यांना अरेरावी करणाऱ्या टाकळी ढोकेश्वर येथील महावितरणचे अधिकारी देशमुख यांना निलंबित करा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. देशमुख यांना निलंबित करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT