Murder Pudhari
अहिल्यानगर

Parner Murder Case: ढवळपुरी डोंगरात सासऱ्याचा गळा आवळून खून; जावई व मित्र पोलिसांच्या ताब्यात

पत्नी नांदत नसल्याचा राग आणि वारंवारच्या वादातून टोकाचे पाऊल; पारनेर तालुक्यात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नगर: सासऱ्याचा खून करून ढवळपुरीच्या डोंगरात मृतदेह फेकून देणाऱ्या जावयासह त्याच्या मित्राच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पत्नी नांदत नाही आणि सासरा वारंवार वाद घालत असल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना पारनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अमित नारायण डुकरे (रा. पारगावतर्फे आळे, ता.जुन्नर,जि. पुणे), अमोल उत्तम डुकरे (रा. औरंगपूर,ता.जुन्नर,जि.पुणे) असे आरोपींचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ढवळपुरी शिवार डोंगरात (ता.पारनेर,अहिल्यानगर) येथे रामदास निवृत्ती सोनवणे (वय 55, रा. निमगाव सावा, ता.जुन्नर,जि.पुणे) याचा कोणीतरी अज्ञात कारणासाठी गळा आवळून खून मृतदेह फेकून दिला. याबाबत तुळशीराम निवृत्ती सोनवणे (रा. सुलतानपूर, ता.जुन्नर,जि.पुणे) यांनी 25 फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीखक किरणकुमार कबाडी यांना गुन्हा घडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार कबाडी यांनी उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलिस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, दीपक घाटकर, रिचर्ड गायकवाड, अमृत आढाव, रमिझराजा आत्तार, आकाश काळे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रवाना केले.

पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता वरील हा खून मयताचे जावई अमित डुकरे व त्याचा मित्र अमोल डुकरे यांनी केल्याची माहिती हाती आली. त्यानुसार पथकाने अमित डुकरे, अमोल डुकरे यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

...म्हणून गळा आवळून केला खून

पत्नी ही सुमारे एक वर्षापासून नांदत नसून सव्वा वर्षाची मुलगी आहे. सासरा हा वारंवार वाद घालून माझ्या मुलीस मारून टाकण्याची धमकी देत होता. त्याचा राग आल्याने आरोपी मित्र अमोल डुकरे यांच्या मदतीने सासरा रामदास निवृत्ती सोवणे यास कारमध्ये घेवून जावून गळा आवळून खून केला. मृतदेह ढवळपुरी शिवार डोंगरात फेकून दिल्याची कबुली आरोपी अमित डुकरे याने दिली. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासाकामी पारनेर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT