जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा कल  pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar News: ‘माझी शाळा ठरतेय माझा अभिमान’; शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी सुट्टीतही गुरुजी शाळेवरच!

Ahilyanagar ZP School: आज पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. मिशन आरंभमुळे शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल उत्कृष्ठ लागला

पुढारी वृत्तसेवा

नगर: सीईओंची संकल्पना, शिक्षणाधिकार्‍यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न, यामुळे आज पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. मिशन आरंभमुळे शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल उत्कृष्ठ लागला आहे. मात्र यावरच न थांबता आता शिक्षकांनी स्वयंस्फुर्तीने सुट्टीतही विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते आहे. आजमितीला सुमारे 362 शाळांमध्ये दररोज संबंधित शिक्षक शाळेत येऊन पाचवीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक शाळांमध्ये इन्ट्रॅक्टीव्ह पॅनलवर शिक्षण घेताना मुलेही ‘डिजीटल’ बनताना पाहून पालकही समाधानी आहेत.

सध्या शिक्षण क्षेत्रात स्पर्धेचे युग आहे. यात गुणवत्त्तेसोबत भौतिक सुविधा देण्यातही जिल्हा परिषद मागे राहिलेली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिक्षण विभागात अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यातील मिशन आपुलकीच्या मोठ्या यशानंतर मिशन आरंभही राज्यासाठी पथदर्शी ठरताना दिसत आहे.

सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात माझ्या शिक्षकांनी केलेल्या प्रामाणिक कामाचे हे फलित आहे. अवांतर कामाचा बोजा असतानाही शिक्षकांनी गुणवत्तेवर भर दिला. त्यामुळेच नवोदय, शिष्यवृत्तीत जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी चमकले. खासगी परीक्षांमधूनही विद्यार्थ्यांना फायदा झाला, त्यातही आपलेच विद्यार्थी पुढे असल्याचे समाधान आहे.
रावसाहेब रोहोकले, राज्य शिक्षक नेते

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी आपल्या सर्व शिक्षकांच्या टीमसोबत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रामाणिक तयारी करून घेतली. त्याचे यश निकालात पहायला मिळाले. आता पुढील वर्षीची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सध्या सुट्ट्या असतानाही शिक्षक स्वयंस्फुर्तीने दररोज सकाळी 8 ते 10 या वेळेत शाळेवर जाऊन तासिका घेत आहे. विद्यार्थीही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दिसत आहे.

जिल्ह्यात पाचवीच्या 761 शाळा आहेत. यात साधारणतः 12500 विद्यार्थी आहेत. यापैकी 362 शाळांमध्ये सध्या तासिका सुरू आहेत. शिवाय मिशन आरंभच्या परीक्षेतील गुणवत्ताधारक 500 विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून ऑनलाईन मार्गदर्शन वर्गही सुरूच आहेत. शिक्षणाधिकारी पाटील हे दररोज याचा आढावा घेत आहे.

दत्तक शाळा योजनाही कौतुकास्पद

सीईओंनी अधिकार्‍यांकडे शाळा दत्तक दिल्या आहेत. यात स्वतः शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी घोसपुरीची शाळा दत्तक घेऊन त्याची गुणवत्ता वाढवून दाखवली आहे. आता 95 केंद्र प्रमुख, 54 विस्तार अधिकारी आणि 14 गटशिक्षणाधिकारी यांच्याकडेही प्रत्येकी दोन दोन शाळांची दत्तक म्हणून गुणवत्ता वाढीची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT