Wari Special ST Pudhari
अहिल्यानगर

Wari Special ST Bus: वारकऱ्यांसाठी लालपरी आता थेट गावात! पारनेर आगाराच्या ३० विशेष गाड्या धावणार

एकाच गावातून किमान ४४ वारकरी तयार झाल्यास लालपरी थेट त्या गावात जाऊन सेवा देणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पारनेर आगार सज्ज झाले आहे. यंदाही वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुलभ व्हावा, यासाठी पारनेर आगारातून पंढरपूरसाठी तब्बल ३० विशेष जादा बस सोडण्यात येणार आहेत. एकाच गावातून किमान ४४ वारकरी तयार झाल्यास लालपरी थेट त्या गावात जाऊन सेवा देणार आहे.

तालुक्यातील अनेक गावांमधून दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या वारीसाठी रवाना होतात. यंदा या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने गावागावांतून थेट बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे भाविकांना बसस्थानकापर्यंत येण्यासाठी अतिरिक्त प्रवास किंवा पायपीट करण्याची गरज भासणार नाही. गावातूनच बस उपलब्ध झाल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भजनी मंडळींचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

मंगळवारी (दि. २१) पारनेर आगारातून पंढरपूरसाठी विशेष जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व बसेसची तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यात आली असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे. चालक-वाहकांसह आगारातील कर्मचारीही सेवेसाठी सज्ज आहेत.

या विशेष बसेसवर सर्व शासकीय सवलती लागू राहणार आहेत. पारनेर ते पंढरपूर प्रवासासाठी पूर्ण तिकीट ४७० रुपये, अर्धे तिकीट २३५ रुपये, तर अमृत योजनेतर्गत ज्येष्ठ नागरिकांना केवळ २ रुपयांत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे ज्येष्ठ वारकऱ्यांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील वारकरी, दिंडी आणि भजनी मंडळींनी एसटीच्या विशेष सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. एका गावातून ४४ प्रवासी उपलब्ध झाल्यास थेट त्या गावात बस पाठविण्यात येईल. असे आगार प्रमुख अमोल कोतकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT