Padegaon Sugarcane Research Centre Pudhari
अहिल्यानगर

Padegaon Sugarcane Research Centre: पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे जागतिक दर्जाचे कार्य; हेच खरे वैभव

ऊस वाणांवरून शेतकऱ्यांनी घरांना नावे दिली, कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे गौरवोद्गार

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने ऊस पिकाच्या संशोधनात जागतिक दर्जाचे कार्य उभे केले असून, आज अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरांना या केंद्राने विकसित केलेल्या ऊस वाणांची नावे दिली आहेत, हेच या संशोधन केंद्राचे खरे वैभव असल्याचे गौरवोद्गार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी काढले.

कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्यासह केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. खर्चे म्हणाले की, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या यशस्वी वाटचालीत आजपर्यंत कार्यरत असलेले ऊस विशेषज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी तसेच प्रत्यक्ष शेतात कष्ट करणारे मजूर यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच विद्यापीठाचे माजी कुलगुरू व संशोधन संचालकांचेही योगदान महत्त्वाचे आहे.

या गुणवत्तापूर्ण संशोधनाची परंपरा भविष्यातही सातत्याने जपली जाणे गरजेचे आहे. संशोधन केंद्राची इमारत जुनी झाल्याने महाराष्ट्र शासनाने नवीन प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, शेतकरी प्रशिक्षण सभागृह व कर्मचारी निवासस्थानांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. पुढील काळात संशोधन अधिक प्रभावी करण्यासाठी केवळ इमारती नव्हे, तर आधुनिक प्रयोगशाळा, अद्ययावत उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता , इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारखे आधुनिक तंत्रज्ञान, रस्ते, कुंपण भिंत आदी पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच संशोधन केंद्रातील ऐतिहासिक वास्तू, यंत्रे व उपकरणे वारसा स्वरूपात जतन व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी महाराष्ट्राच्या अर्थकारणात ऊस पिकाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले.

डॉ. राजेंद्र भिलारे यांनी संशोधन केंद्राचा इतिहास, उपलब्ध संसाधने, मनुष्यबळ, सुरू असलेले संशोधन व विस्तार उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. कार्यक्रमास ऊस शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे यांच्यासह सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय थोरवे, तर आभार डॉ. सुरेश उबाळे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT