Onion Storage Loss Pudhari
अहिल्यानगर

Onion Storage Loss: कांद्याने पुन्हा दिला शेतकऱ्यांना धोका; चाळीतच सडला हजारो टन कांदा, आर्थिक संकट गडद

भाववाढीच्या आशेने साठवलेला कांदा हवामान बदल व रोगराईमुळे खराब; पंचनामे व विशेष मदतीची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: गेल्या हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे भविष्यात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून चाळीत कांदा साठवला. मात्र, बाजारभावातील घसरण, बदलते हवामान आणि वाढलेल्या आर्द्रेतेमुळे साठवलेला हजारो टन कांदा चाळीतच सडला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. खरीप हंगामाच्या तोंडावरच कांदा भावाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे.

गतवर्षी भरघोस कांदा उत्पादन झाले. मात्र, काढणीच्या काळातच दर घसरले. भविष्यात भाव वाढतील, या अपेक्षेने अनेकांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. त्यासाठी चाळ बांधणी, मजुरी, वाहतूक, औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकर्‍यांनी केला. त्यासाठी बँका व पतसंस्थांकडून कर्ज काढले. मात्र, वाढते तापमान आणि आर्द्रेतेच्या प्रमाणामुळे कांद्यावर काजळी, कूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला.

चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडला. आता तो विक्रीयोग्य राहिलेला नाही. परिणामी, उत्पादन खर्च, साठवणूक खर्च आणि अपेक्षित नफा या तिन्ही गोष्टींवर पाणी फेरले आहे. अनेक शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यात या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत भर पडली आहे.

मुलांचे शिक्षण, आगामी हंगामाची मशागत, बियाणे-खते खरेदी आणि घरगुती खर्च भागविणे कठीण बनले आहे. नुकसानग्रस्त कांद्याचे पंचनामे करून विशेष आर्थिक मदत करावी, तसेच आधुनिक साठवणूक सुविधा, शीतगृह व्यवस्था आणि हमीभाव धोरण राबविण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात. शासनाने बाजारात हस्तक्षेप करून कांदा खरेदी केली असती वा हमीभाव दिला असता, तर शेतकर्‍यांचे नुकसान कमी झाले असते.

कांद्याचा उत्पादन खर्चही निघेना!

भाव वाढण्याच्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र, हवामानातील बदल व रोगराईमुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. आता उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. नुकसानग्रस्त कांद्याचे तातडीने पंचनामे करावेत. विशेष आर्थिक मदत व अनुदान जाहीर करावे. पीककर्ज व व्याजमाफी लागू करावी. कांद्यासाठी हमीभाव योजना राबवावी, असे पानसवाडीचे शेतकरी -बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT