नगर: छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर धनगरवाडी शिवारात गणपती मंदिराजवळ जेसीबी व दुचाकी अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 29) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात की घातपात याची अहिल्यानगर शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.
प्रदीप शिवराम चिंचाणे (वय 51, रा. सप्तशृंंगी कॉलनी, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, विजय दत्तात्रय कजबे (रा. सावेडी) जखमीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ जेसीबी आणि दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुसऱ्या जखमीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुसरीकडे हा अपघात नसून घातपात आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, धनगरवाडी येथे मित्राच्या प्लॉटमधून मुरूम उपसा होत असल्याने प्लॉटधारक व प्रदीप चिंचाणे गुरुवारी (दि. 28) रात्री थेट धनगरवाडी शिवारात गेले होते. त्यांनी प्लॉटमधील मुरूम उपसा बंद केला. मात्र, काहींनी मुरूम उपसा करीत असलेल्या जेसीबीचा पाठलाग सुरू केला.
छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर जेसीबी अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यात जेसीबीने दुचाकीला धडक दिल्याने प्रदीप चिंचाणे यांचा मृत्यू झाला आणि विजय कसबे गंभीर जखमी झाला, अशी चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, त्याबाबत कोणीही ठोस माहिती देण्यास तयार नाही.