नगर : शाळकरी मुलींना जवळ घेत बॅड टच करीत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 24) माळीवाडा येथील एका शाळेसमोर घडली. वैभव बबन हुच्चे (रा. माळीवाडा अ.नगर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पीडित शाळकरी मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले की, मुलगी इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये शिकत आहे. ती 23 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता रडत रडत सांगितले, की आमच्या शाळेच्या शेजारी गेटवर एक ताक विकणारा माणूस मला तसेच माझ्या मैत्रिणींना एक महिन्यापासून त्रास देत आहे. मला त्याच्याकडे बोलावून घेऊन तुझे नाव काय आहे, असे म्हणत गाल ओढले, खांद्यावरून गळ्यावरून, अंगावरून हात फिरवला. त्यानंतर ती त्याला सोड म्हणाल्याने तो तिला म्हणाला की, घरी कोणाला काहीएक सांगायचे नाही. त्याच्याकडे गेलो नाही तर तो आमचे दप्तर हिसकावून घेतो. बळजबरीने आमच्या अंगावरून हात फिरवतो व आम्हाला ‘बॅड टच’ करतो असे तिने सांगितले.
त्यामुळे 24 एप्रिलला शाळेच्या गेटवर खात्री करण्याकरिता थांबलो असता मुलगी व तिच्या आठ मैत्रिणींसह येत असताना ताकवाल्याने त्यांना बोलावून मुलीच्या अंगावर हात फिरवून, गाल ओढून मानेवर हात फिरवले. याबाबत फिर्यादीने ताकवाल्याला विचारला की, लहान मुलासोबत असे अश्लील चाळे कशाकरिता करतो? असे म्हणताच त्याने फिर्यादीची गचांडी पकडून भांडण सुरू केले.
या घटनेची शिक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. त्याला नाव विचारले असता त्याने नाव वैभव बबन हुच्चे (रा.माळीवाडा अ.नगर) असे सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी हुच्चे याच्याविरुद्ध पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.