कोळपेवाडी: कोरड्या शिवारात हिरवाई फुलविण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे निळवंडे धरणाच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या कोपरगाव तालुक्यातील जवळके, धोंडेवाडी, बहादराबाद व शहापूर येथील शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नांतून बुधवार (दि.२५) रोजी निळवंडे कालव्याचे पाणी या चार गावांच्या लाभक्षेत्रात दाखल झाले.
वितरिका क्रमांक ४ वरील बसवलेला व्हॉल्व्ह शेतकऱ्यांनी स्वतः फिरविला आणि कित्येक दशकांपासून पाहिलेले पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. शिवारात पाणी पोहोचताच शेतकऱ्यांनी आमदार काळे यांचा जय-जयकार करीत जल्लोष केला. हा क्षण केवळ पाणी मिळाल्याचाच नव्हता, तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला मिळालेल्या यशासह उद्याच्या अपेक्षांचा होता. निळवंडे कालव्याचे पाणी चार गावातील बंधारे व पाझर तलावांपर्यंत पोहोचविण्यासाठी वितरिका क्रमांक ४ वरील व्हॉल्व्हची पाईपलाईन एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून टाकणे बाकी होते.
यामुळे पाणी पोहोचण्याचा मार्ग अडला होता, मात्र शेतकऱ्यांची पाण्यासाठीची तळमळ व दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन आमदार काळे यांनी या अडचणीत यशस्वी मध्यस्थी केली. संबंधित शेतकऱ्याची समजूत काढून, पाईपलाईन कामातील अडथळा दूर केला. उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत, त्यांनी प्रशासनाकडून कामाला गती दिली. त्यांच्या या समयसूचक भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून रखडलेले काम अपेक्षित वेळेत पूर्ण झाले आणि चार गावांच्या शिवारात पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. व्हॉल्व्ह फिरवून पाण्याची पहिली धार कालव्यातून पुढे सरकली आणि अवघ्या तासाभरात पाणी लाभक्षेत्रात पोहोचले.
यंदा भीषण दुष्काळाने या भागातील शेतकरी व ग्रामस्थांची अवस्था अधिक बिकट केली. टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या, या जिरायती भागात निळवंडेचे पाणी पोहचणे म्हणजे दुष्काळाच्या काळोखात आशेचा किरणचं ठरला आहे. हे पाणी केवळ बंधारे आणि पाझर तलाव भरणार नाही, तर भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासोबतच शेतीला नवे बळ आणि शेतकऱ्यांच्या जगण्याला नवी उमेद देणार आहे. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत, दिलेला ‘शब्द’ त्यांनी कृतीतून पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली.
‘लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वतः व्हॉल्व्ह फिरवून ‘निळवंडे’चे पाणी शिवारात सोडले. हा आयुष्यातील अत्यंत आनंदासह समाधानाचा क्षण आहे. हे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचावे, यासाठी भर उन्हात कालव्याच्या भरावावर बसून काम पूर्ण होईपर्यंत ठाण मांडले. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मार्ग काढला. आज शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी वाहताना पाहून घेतलेल्या कष्टांचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे समाधान वाटत आहे.आमदार आशुतोष काळे, कोपरगाव