...तर मी खासदारकीचा राजीनामा: निलेश लंके Pudhari
अहिल्यानगर

Nilesh Lanke News|...तर मी खासदारकीचा राजीनामा: निलेश लंके

जलजीवन मिशनअंतर्गत 830 पाणी योजनापैकी 210 पाणीयोजना पूर्ण झाल्याचा दावा गेल्या बैठकीत करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

नगर: जलजीवन मिशनअंतर्गत 830 पाणी योजनापैकी 210 पाणीयोजना पूर्ण झाल्याचा दावा गेल्या बैठकीत करण्यात आला होता. पूर्ण झाल्याचे दाखविलेल्या योजना अपूर्ण असतील तर उपअभियंता श्रीरंग गदडे यांनी राजीनामा द्यावा.

जर त्या योजना पूर्ण झाल्या असतील तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे ओपन आव्हान खासदार नीलेश लंके यांनी दिले. या योजनेत कोट्यवधींंचा घोटाळा झाला आहे. या योजना ठेकेदार व अधिकार्‍यांनीच खाऊन टाकल्याचा थेट आरोप खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शुक्रवारी दिशा बैठकीत केला. (Latest Ahilyanagar News)

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली. यावेळी सहअध्यक्ष खासदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, प्रकल्प संचालक राहूल शेळके, सुनीता भांगरे, माजी महापौर अभिषेक कळमकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 830 पाणी योजनांपैकी 210 पाणीयोजना पूर्ण झाल्याचा दावा गेल्या दिशा बैठकीत करण्यात आला होता. त्यावरून खासदार लंके यांनी शुक्रवारी झालेल्या दिशा बैठकीत पुन्हा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले.

या बैठकीत जलजीवन योजनेवरून अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यात दोन्ही खासदारांच्या तांत्रिक प्रतिनिधीचा समावेश करून, सर्व योजनांची चौकशी करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

या बैठकीत मिशन, महावितरण, माध्यमिक शिक्षण व कृषी विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. जलजीवन मिशनच्या पाणी योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाला. या योजनेची चौकशीस केंद्रीय समिती आली असता तिलादेखील गोलमाल करून चुकीचा अहवाल दिला. त्यांचा आका कोण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याबाबत देखील राज्यपालांकडे तक्रार केली असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंता चव्हाण यांना शंभर दिवसांच्या रजेवर पाठवून 27 कोंटी रुपयांची बिले काढली. आतापर्यंत 913 कोटी रुपये निधी आला. म्हणजे 85 टक्के काम होणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही योजना अपूर्णच आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा ठराव खासदार लंके यांनी मांडला. माध्यमिक शिक्षण विभागात लोकांचा छळ होत आहे. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून, पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, असे खासदार वाकचौरे म्हणाले.

हे जिल्हाधिकारी तुमचा प्रश्न सोडवतील: खा. लंके

कुंभेफळ येथील लखपती रामभाऊ कोटकर या प्रकल्पग्रस्ताने स्वत:च्या जमिनीबाबत व्यथा मांडली. निळवंडे कालव्यासाठी कोणतीही नोटीस न देता अडीच एकर जमीन बेचिराख केली. या जमिनीचा मोबादला दुसर्‍यालच दिला. पाच वर्षांपासून अधिकार्‍यांच्या दारोदारी फिरत असल्याचे सांगितले. हे जिल्हाधिकारी पूर्वीसारखे नाहीत. याचा एकदा अनुभव घ्या. एक फाईल प्रलंबित नाही. तुम्ही यांना शुक्रवारी भेटा. तुमचे काम झाल्याशिवाय राहाणार नाही, असे सांगत लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कामाचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT