नेवाशात गडाख-लंघे गटात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार  Pudhari
अहिल्यानगर

Newasa Politics: नेवाशात गडाख-लंघे गटात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार

प्रभाग रचनेत मोठे बदल झाल्याने ही निवडणूक इच्छुकांसाठी अग्नीपरीक्षा असणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gadakh vs Langhe Newasa politics

नेवासा: विधानसभा निवडणुकीनंतर नेवाशाचे राजकारण बदलले. माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पराभूत करून शिवसेनेकडून विठ्ठलराव लंघे हे नेवाशाचे आमदार झाले.

मात्र, गडाखांचा पराभवानंतरही त्यांचा ‘नेवाशा’तील जनसंपर्क पाहता आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत गडाख-लंघे गटात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळण्याचे संकेत आहे. शहरात माजी आमदार मुरकुटेंचीही ‘व्होट बँक’ आहे हे विसरून चालणार नाही. प्रभाग रचनेत मोठे बदल झाल्याने ही निवडणूक इच्छुकांसाठी अग्नीपरीक्षा असणार आहे. (Latest Ahilyanagar News)

नेवासा शहराच्या राजकारणात नेहमीच गडाखांपेक्षा मुरकुटे, लंघे हे वरचढ दिसलेले आहेत. तर सोनई, खरवंडी, चांदा या भागात गडाखांचा वरचष्मा राहिलेला आहे. आता नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी विद्यमान आमदार लंघे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर गडाख समर्थकांकडून ‘टायगर अभी जिंदा है’ हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे ही निवडणूक गाजण्याची शक्यता आहे.

नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करताना 2011 च्या जनगणनेला आधारभूत मानलेले आहे. 2017 मधील निवडणुका त्याच जनगणनेला गृहीत धरून वार्ड रचना केली गेली. आगामी काळात होणार्‍या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची मोडतोड का करण्यात आली? हीच आरोळी नेवासकरांमध्ये घुमत आहे. प्रभाग तोडला असा आता विकास करायचा कसा? असा प्रश्न इच्छुक नगरसेवकांना पडला आहे.

यावेळी देखील 2011 च्या जनगणनेला प्रमाण मानलेले असताना मोडतोड करण्याची गरज का पडली? निवडणूक प्रक्रिया राबवणारे अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडले? हे प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत.

मागच्या वेळी प्रभाग 11 मध्ये असलेला कोमट गल्ली पासुनचा भाग प्रभाग एकमध्ये असलेल्या परदेशी हॉस्पिटल जवळील राजू वाघ यांच्या घरापर्यंत पसरला आहे. म्हणजे प्रभाग 11 मध्ये दोन्ही टोक जोडायचे असतील तर मधल्या एका वार्डामधून तिकडे उडी मारावे लागते. अशा परिस्थितीत नगरसेवक आपल्या वार्डाचा विकास कसा करू शकतील यावर प्रश्नचिन्ह आहे.

वार्ड रचना करताना नगरसेवकांना आपापल्या प्रभागामध्ये सोयीस्कर काम करता येईल अशी पद्धत अवलंबणे गरजेचे आहे. मधमेश्वरनगरचे दोन तुकडे करून काय साध्य करण्यात आल्याचे नागरिक बोलत आहेत. अशाप्रकारे विकास करताना तुकडे तुकडे केल्याने विकासाची गत कशी होणार आहे. अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशा पद्धतीची आउटघटकेची प्रभाग रचना करून शहरांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रशासनाचा डाव आहे असा संशय शहरातील राजकीय धुरीणांकडून व्यक्त केला जात आहे. शहरातील 17 प्रभागांची मोडतोड झाल्याने इच्छुक नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रभाग रचनेमुळे नागरिकांचा गोंधळ होत असल्याने स्पष्टीकरण कोणाला देता येईना, अशी गत सध्या झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT