नगर: जिल्हा परिषद गट व गणांची प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द झाली आहे. ज्या गावाची लोकसंख्या अधिक आहे. त्या गावाच्या नावाने गट ओळखला जाणार आहे. त्यानुसार सात गटांची नावे बदलली आहेत. यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील देहरे गट आता नवनागापूर, संगमनेरातील वडगाव पान गट आता तळेगाव, कोपरगाव तालुक्यातील वारी गट आता संवत्सर नावाने ओळखला जाणार आहे.
पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये जिल्हा परिषदेचे 73 गट होते. आता 2025 मध्ये दोन गटांची वाढ होऊन 75 गटांची प्रारुप रचना प्रसिध्द झाली. 2017 मध्ये अहिल्यानगर तालुक्यातील देहरे हा जिल्हा परिषदेचा 46 नंबरचा गट होता. या गटातील नवनागापूर गावाची लोकसंख्या अधिक असल्याने देहरेऐवजी आता नवनागापूर गट गणला जाणार आहे. (Latest Ahilyanagar News)
अकोले तालुक्यात धामणगाव आवारी नावाने गट होता. तो आता धुमाळवाडी नावाने संभोधला जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गटाचे नाव आता तळेगाव करण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात वारी गट होता. आता याच गटातील संवत्सर गावाला गदाचा दर्जा देण्यात आला आहे. चांदेकसारे गटाचे नाव आता पोहेगाव बुद्रूक करण्यात आले आहे.
पाथर्डी तालुक्यात गेल्यावेळी माळीबाभुळगाव नावाचा गट होता. आता हाच गट तिसगाव नावाने संभोधला जाणार आहे. राहुरी तालुक्यातील सात्रळ गावाने गट होता. आता याच गटाला गुहा नावाने ओळखले जाणार आहे.
दरम्यान, अहिल्यानगर तालुक्यातील पूर्वीच्या देहरे गटातील निमगाव घाना या गावाचा निंबळक गटात समावेश केला. जेऊर गटातील आगडगाव नागरदेवळे गटात टाकले. नागरदेवळे गटातील रतडगाव आता जेऊर गटात गेले आहे. टाकळी काझी, वाळूंज आता दरेवाडीत समाविष्ट झाले आहे.
चापडगाव, साकत नवीन गट
कर्जत तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेचे मिरजगाव, कुळधरण, राशीन व कोरेगाव असे चार गट होते. या रचनेत चापडगाव हा नवीन गट अस्तित्वात आला आहे. जामखेड मध्ये खर्डा आणि जवळा हे दोन गट होते. या आता नव्याने साकत हा तिसरा गट निर्माण करण्यात आला आहे.