

नगर: शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या घोटाळ्याची चर्चा राज्यात सुरू असताना, सोमवारी धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानच्या विश्वस्तांना ‘कारवाई का करू नये,’ अशी सुमोटो नोटीस बजावली आहे. त्याबाबत शुक्रवारी (दि. 18) मुंबई येथे सुनावणीसाठी विश्वस्तांना हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
याबाबतची माहिती अशी की, बनावट अॅप, अनावश्यक नोकरभरती अशा वेगवेगळ्या कारणांनी शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांमागे जणू साडेसाती लागली आहे. यामधील नोकरभरतीबाबत शासनाने वर्षभरापूर्वी चौकशी समिती नेमली होती. (Latest Ahilyanagar News)
धर्मादाय सहआयुक्त एस. एस. बुक्के यांनी याप्रकरणी प्रत्यक्ष देवस्थानला भेट देऊन चौकशी अहवाल तयार केला होता. तो शासनाला पाठविला होता. नुकत्याच सुरू असलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सभागृहात मांडताना देवस्थानचे विभाग आणि त्या ठिकाणी नेमलेले कर्मचारी यांचा आरसाच समोर ठेवला होता.
या वेळी त्यांनी ही बाब गंभीरपणे घेतल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, सोमवारी राज्य धर्मादाय आयुक्त अमोघ कालोटी यांनी पुढे येत, देवस्थानच्या विश्वस्तांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावल्याचे सूत्रांकडून समजले आहे. न्यासांतर्गत 1950 च्या कलम 41 ड अन्वये विश्वस्त म्हणून आपल्यावर कारवाई का करू नये, असा आशयाची ही नोटीस असल्याचे समजते. दि. 18 जुलै रोजी मुंबईत ही सुनावणी होणार असून, त्यात काय बाजू मांडली जाते, याकडे सार्यांचे लक्ष असेल.
डिसेंबरनंतर ‘देवस्थान’ सरकारच्या ताब्यात
सध्याच्या विश्वस्तांची मुदत ही डिसेंबर 2025 ही आहे. त्यामुळे त्यानंतर हे देवस्थान सरकारच्या अखत्यारीत येणार आहे. देवस्थान ताब्यात घेतानाच, सध्या असलेल्या कर्मचार्यांना देखील राज्य सरकार सेवेत समाविष्ट करून घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्याच्या दोन हजार कर्मचार्यांना सेवेत घेतले जाणार की अगोदर कर्मचारी कमी करून त्यानंतर आवश्यक कर्मचार्यांना घेतले जाणार, याविषयीही आतापासूनच चर्चा सुरू आहेत.