Nevasa News Pudhari
अहिल्यानगर

Nevasa News: भोंदूबाबा अशोक खरातकडून कांदा उत्पादकांना गंडा; कारवाईची शेतकरी संघटनेची मागणी

नाशिक एसआयटीकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातने महिलांसोबत गैरप्रकार करण्याचे पाप उघड होत असतांनाच त्याने आता बोगस फार्मर्स कंपनीचीही स्थापना करून राज्यातील लाखो कांदा, मका आणि सोयाबीन उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असून, घोटाळ्याची चौकशी करावी, तसेच घोटाळ्यात सहभागी दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाकडून श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांंच्याकडे केली. नाशिक एसआयटीकडेही तक्रार करण्यात आली आहे.

भोंदूबाबा खरातने व्यंकटेश्वर फार्मर्स प्रोडयुसर्स कंपनी व ईशान्यश्वर फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी या दोन कंपन्यांची स्थापना करून शासनाच्या नाफेड आणि एनसीसीएफ ार्फत कांदा खरेदी करण्याचे कंत्राट मिळविले होते. कांदा खरेदीची ही कंत्राटे मिळवून देण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खरात बाबाला मदत केली, त्याचीही चौकशी करून दोषी नेत्यांवरही कारवाई करा, अशी मागणीही शेतकरी संघटनेने केली आहे.

श्री व्यंकटेश्वर फार्मर्स कंपनी ही खरातची असून 70 कोटींची उलाढाल दाखवून नफा केवळ 8 हजार रुपये दाखविण्यात आला आहे, व्यंकटेश्वर व ईशान्यश्वर फार्मर्स कंपन्या व्यतिरिक्त 8 ते 9 कंपन्या रजिस्टर आहेत. इतरही 15 ते 16 फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्यांचा हा भोंदूबाबा खरात संचालक आहे. त्याचेही पुरावे शेतकरी संघटनेने तक्रारी सोबत जोडले आहेत.

कांदा खरेदीशी संबंधित या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मागील 3 वर्षांचे ऑडिट सादर केले नाही. तसेच काहींकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे पणन मंडळाने कडधान्य व तेलबिया खरेदीसाठी नाकारले होते. अशा या खरात बाबा संचालक असलेल्या कंपन्यांनी यंदा नाफेडची कांदा खरेदी केल्याचे स्पष्ट होत असल्याचे शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यातील अशोक खरातच्या अनेक फार्मर्स कंपन्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, देवळा तालुक्यांत असल्याचे उघड झाले आहे.

व्यंकटेश फार्मर्स प्रॉड्युसर्स कंपनीने कांदा खरेदी केल्यावर शेतकऱ्यांचा सात-बारा व गट क्रमांक देण्याऐवजी केवळ 7/12 इतकीच नोंद केली असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीने सलग तीन वर्षांचा ऑडिट रिपोर्टही सादर केला नाही. भोंदू खरातसह संबंधित नेत्यांवर, नाफेड, एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, महिला आघाडी प्रमुख सुनीता वानखेडे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, रवी वानखेडे ,मयूर भनगडे आदींच्या सह्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT