Nevasa Nagar Panchayat Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Municipal Dispute: नेवासा नगरपंचायतीत गोंधळ; उपनगराध्यक्ष व नगरसेवकांवर गुन्हा दाखल

शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी व कामात अडथळा आणल्याचा आरोप; पोलिस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करत कार्यालयातून बाहेर काढून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या व कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपांवरून उपनगराध्यक्ष, सहा नगरसेवक आणि अन्य तिघांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखधान व संलग्न नगरसेवकांनी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजासंदर्भात 27 जानेवारी रोजी 11 वाजता उपनगराध्यक्षांच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्याची मागणी दि.21 जानेवारी रोजी केली होती. त्या अनुषंगाने बैठकीस सदर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना हजर राहण्याबाबत झावरे यांनी आदेशित केले होते.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचा नेवासा येथे नियोजित दौरा असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी झावरे दि.27 जानेवारी रोजी सकाळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (कचरा डेपो) येथे गेले होते. त्याच दिवशी सकाळी 11.20च्या सुमारास उपनगराध्यक्षांच्या दालनात स्वच्छता नसल्याबाबत तसेच बैठकीस आमंत्रित केलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याबाबत उपनगराध्यक्षांचे पती संजय सुखधान यांनी झावरे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. दुपारी बाराच्या सुमारास शहर अभियंता सुनील गांगुर्डे यांनी झावरे यांना फोनद्वारे कळविले की, दालनात स्वच्छता नसल्याने उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान, त्यांचे पती संजय लक्ष्मण सुखधान, नगरसेविका सोनल राहुल चव्हाण, जयश्री चंद्रकांत शिंदे, नगरसेवक जितेंद्र भाऊसाहेब कुऱ्हे, स्वप्नील ऊर्फ सागर राजेंद्र मापारी, संभाजी शिवाजी धोत्रे, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र कारभारी काळे व असिफ पठाण, दिनेश व्यवहारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शासकीय कामकाज बंद पाडले आणि सर्वांना कार्यालयाबाहेर काढून दिले. संजय सुखधान यांनी कार्यालयाची स्वच्छता करण्यासाठी अग्निशामक बंब बोलावण्याबाबत बेकायदेशीर सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली.

त्यानंतर, दुपारी 12.30च्या सुमारास झावरे कचरा डेपोवरील कामकाज आटोपून नगरपंचायत कार्यालयात पोहोचले असता, सर्व अधिकारी व कर्मचारी भयभीत अवस्थेत नगराध्यक्षांच्या दालनात बसलेले दिसले. उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान या नगराध्यक्षांच्या खुर्चीत बसलेल्या आढळून आल्या.

नगराध्यक्षांच्या दालनाबाहेर लावण्यात येणारी अधिकृत पाटीही तेथे नसल्याचे निदर्शनास आल्याचे झावरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT