Nevasa Crop Damage Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Crop Damage: नेवासा परिसरात वादळी पावसाचा तडाखा; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

गहू, कांदा, हरभरा पिके भुईसपाट; शेतकरी हवालदिल, पंचनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नेवासा : नेवासा परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, कांदा पिकांना मोठा फटका बसला आहे. गव्हाचे पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविल्याने गह, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक भागात आगास कांदा व गहू काढणीच्या उंबरठ्यावर आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सहा वाजेनंतर रात्री तालुक्यातील नेवाशासह परिसरात वादळी पावसाने थैमान घातले. काढणीयोग्य गहू भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याचे दिसले.

या वादळामुळे गहू, हरभरा, कांदा व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके जमिनीवर झोपल्याचे चित्र दिसत आहे. आधीच काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच आंबा व इतर फळबागांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याचेही आढळून आले.

नेवासा परिसरातील नेवासा बुद्रुक, साईनाथनगर, लेकूरवाली आखाडा, खडका, मडकी, खलालप्रिंपी, नेवासा फाटा, मक्तापूर, गोंडेगाव, पिचडगांव, म्हसले, सलाबतपूर, जळका, वांजोळी आदी भागांत अवकाळी पावसाचा फटका बसला.

वादळाने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून जनजीवनही काही काळ विस्कळीत झाले होते . शेतकऱ्यांनी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या!

वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, ज्वारी व आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी नेवासा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कोकणे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT