नेवासा : नेवासा शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी थेट ग्राउंड झिरोवर उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. जायकवाडीतील उपसा केंद्र ते फिल्टर प्लांट आणि शहरातील साठवण टाक्यांपर्यंतच्या यंत्रणेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तांत्रिक त्रुटी व गळतीची माहिती घेत त्यांनी पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती घेत योग्य सूचना दिल्या तर नवीन योजना पूर्ण होईपर्यंत जुनी यंत्रणा सक्षम करून नेवासकरांची तहान भागवणे हे आमचे कर्तव्य आहे. नागरिकांना पाण्याअभावी त्रास होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार डॉ. घुले यांनी व्यक्त केला.
शहराचा पाणीपुरवठा उपसा, शुद्धीकरण आणि वितरण या तीन टप्प्यांवर अवलंबून आहे. मात्र, जीर्ण पाईपलाईन, नादुरुस्त एअर व्हॉल्व, मोटार बिघाड आणि मर्यादित मनुष्यबळ यामुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे.
यावर उपाय म्हणून नगराध्यक्षांनी तातडीने गळती दुरुस्त करणे, व्हॉल्व नियोजन शिस्तबद्ध करणे आणि फिल्टर बेडच्या स्वच्छतेचे आदेश दिले आहेत. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखाली नवीन पाणीयोजना कार्यान्वित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
ही योजना पूर्ण होईपर्यंत जुनी व्यवस्था कोलमडू नये, यासाठी नगराध्यक्षांनी स्वतः फिल्डवर नियंत्रण मिळवून प्रशासनाला अँक्शन मोडवर आणले आहे.
केवळ बैठका न घेता नगराध्यक्षांनी थेट जायकवाडी उपसा केंद्र व फिल्टर प्लांटवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तांत्रिक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जागेवरच सोडवल्याने कामाला गती आली आहे. या सक्रियतेमुळे पाणीपुरवठा नियमित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जात आहे.