Arrested Pudhari
अहिल्यानगर

NEET Paper Leak Arrest: नीट पेपरफुटी प्रकरण; राहुरीतून तरुणाला CBI कडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अहिल्यानगरच्या राहुरीतून एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार आहे

पुढारी वृत्तसेवा

नगर/राहुरी: नीट पेपर फुट प्रकरणात सीबीआयने नाशिकनंतर अहिल्यानगरच्या राहुरीतून आणखी एका तरुणाला अटक केली. अटकेतील या तरुणाला दिल्लीत नेण्यासाठी नगरच्या कोर्टाने दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयला बीडचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते. धनंजय निवृत्ती लोखंडे (वय 26, रा. म्हाडूक सेंटर,राहुरी) असे सीबीआयने अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या ‌‘नीट‌’ परीक्षा पेपर फुटी लोण अहिल्यानगर जिल्ह्यात पोचले. नाशिक येथून सीबीआयच्या मुंबई युनिटने नीट पेपर फुटीप्रकरणात शुभम खैरनारला उचलल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून सीबीआयच्या पथकाने मंगळवारी रात्री धनंजय लोखंडे यास ताब्यात घेतले. नगर येथील एलसीबीच्या कार्यालयात बुधवारी कसून चौकशी केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

नीट पेपर फुटीचे प्रकरण देशात सध्या गजात आहे. सीबीआय पथक विविध शहरामध्ये छापे घालून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेत आहेत. सीबीआयने नाशिकमधून शुभम खैरनार यास ताब्यात घेतल्यानंतर पेपरचा सौदा झाल्याचे पुढे आले. त्याच्याच चौकशीत अहिल्यानगर जिल्ह्यातील लोखंडेचे नाव पुढे आले. त्यानुसार सीबायआयच्या मुंबई युनिटच्या पथकाने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी संपर्क साधत स्थानिक पोलिसांची मदत मागितली.

सीबीआयचे पथक बुधवारी अहिल्यानगरात पोहचले. या पथकाने स्थानिक गुन्हे शाखा व राहुरी पोलिसांच्या मदतीने संशयित धनंजय लोखंडेसह तिघांना ताब्यात घेतले. अन्य दोघांचा सहभाग नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र लोखंडे याची कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला दिल्लीत नेले जाणार असून त्यासाठी ट्रान्झिट रिमांड न्यायालयाने मंजूर केला.

दरम्यान, संशयित धनंजय लोखंडे हा मोबाईल बंद करून पुण्याच्या वाघोलीतून गावी आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. त्याचे वडील एका खासगी शिक्षण संस्थेत लिपिक तर, आई गृहिणी आहे. दुसरा भाऊ डॉक्टर आहे.मंगळवारी रात्री तो देवळाली प्रवरा-बाभळेश्वर परिसरात असताना सीबीआय मुंबई युनिट, एलसीबी, राहुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बीएएमएसचे शिक्षण अर्धवट सोडले

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संशयित धनंजय लोखंडे याने बीएएमएस साठी बंगलोर (कर्नाटक) येथे प्रसन्ना आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे प्रवेश घेतला होता. द्वितीय वर्षांमध्ये तो काही विषयात नापास झाला. त्याने तृतीय वर्षासाठी प्रवेश घेतला. मात्र, त्यानंतर तो कॉलेजला गेला नाही. तेव्हापासून तो वाघोली येथे राहत होता. तो वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT