शिवसेनेच्या बैठकीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Politics: शिवसेनेच्या बैठकीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

मंत्र्यांसमोरच जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्यावर संतापले तालुकाप्रमुख

पुढारी वृत्तसेवा

नगर: शिवसेना जिल्हाप्रमुखाला हाताशी धरून निधी पळविणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या बैठकीत पाहून तालुकाप्रमुखांचा पारा चढला. संतप्त तालुकाप्रमुखांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ‘प्रसाद’ देत स्वपक्षाला डावलून इतरांना निधी देणार्‍या जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांची हकालपट्टी करण्याची मागणी तालुकाप्रमुखांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे नाव लष्करे असून तो कर्जतचा असल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये नगर शिवसेनेची बैठक बोलावली होती. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव यांच्यासह तालुका प्रमुख बैठकीला उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)

या बैठकीत लष्करे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ताही बसलेला होता. बैठक संपल्यानंतर बाहेर पडताना त्याला कैलास माने व बापू नेटके यांनी पाहिले. शिवसेनेचा पदाधिकारी नसतानाही तो बैठकीत कसा? तसेच निधी पळविल्याच्या रागातून या दोघांनी त्याला ‘प्रसाद’ दिला. इतर पदाधिकार्‍यांनी त्याला सोडवले.

बाबूशेठ टायरवाले हे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख आहेत. त्याच्याकडे राहुरी, कर्जत, जामखेड आणि शेवगाव तालुक्याची जबाबदारी आहे. या तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना निधी देण्याऐवजी टायरवाले यांनी राष्ट्रवादीच्या लष्करे यांना निधी देण्याचे शिफारस पत्र दिले. त्या पत्रावरून त्याला निधीही मिळाला.

लष्करे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून ठेकेदारीही करतो. टायरवाले यांनी पत्र दिल्याने त्याला निधी मिळाल्याचा दावा करत माने व नेटके यांनी टायरवाले यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता घुसल्याने राडा झाल्याच्या वृत्ताला उपस्थित शिवसैनिकांनी दुजोरा दिला.

टायरवालेसोबतच लष्करे बैठकीत

जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी राहुरी, शेवगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यात स्वपक्षाच्या कार्यकर्त्याला डावलून इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना निधी दिल्याची बाब तालुका प्रमुखांना खटकली. त्यातून त्यांचे टायरवालेसोबत खटकेही उडाले. याच टायरवाले यांनी लष्करे याला बैठकीसाठी आणले. इतकेच काय तर तो बैठकीत बसलाही. निधीत डावलले आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बैठकीत बसल्याचे पाहताच संताप अनावर होत तालुका प्रमुखांनी त्याला ‘प्रसाद’ दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT