

राहुरी: केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पदवी व शिक्षणशास्त्र हि पदवी घेताना शाळेत रजा न टाकता पदवी धारण करणार्या शिक्षकांची नावे पदोन्नत्ती यादीतून वगळून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आनंद भंडारी यांच्याकडे देवळाली प्रवरा येथिल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रप्रमुख पदोन्नती 2024- 2025 च्या प्रक्रियेतून ज्या प्राथमिक शिक्षकांनी केंद्रप्रमुख ही पदोन्नत्ती घेण्यासाठी शिक्षक पदवीधर किंवा शिक्षणशास्त्र हि पदवी प्राप्त केलेली आहे. शिक्षकांनी कोणतीही पदवी घेताना रजा टाकून शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यालयातील 75 टक्के उपस्थितीची अट असते. तरच परीक्षेला बसता येते. (Latest Ahilyanagar News)
शिक्षक मात्र शाळेत हजर राहुन पदवी व शिक्षणशास्त्राचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे पगार घ्यायचा आणि दुसरीकडे नियमित शिक्षण घेतल्याचे दाखविले जाते. यावरुन शासनाची फसवणूक केली जात आहे.
शाळेत रजा न टाकता नियमित (रेगुलर) पद्धतीने पदवीचा व बी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांची नावे केंद्रप्रमुख पदोन्नत्ती यादीतून वगळण्यात येवून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी उंडे यांनी केली आहे.
शिक्षणाधिकार्यांच्या आदेशाला ठेंगा ?
केंद्रप्रमुख पदोन्नती पदवी व शिक्षणशास्त्र पदवी रजा न टाकता पुर्ण करणार्या शिक्षकांची नावे पडताळणी करुन तशा प्रकारचा अहवाल 11 जुलैपर्यंत सादर करण्याचे लेखी आदेश 3 जुलै रोजी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले होते. परंतु या आदेशाला एक महिना पुर्ण होवूनही गटशिक्षणाधिकारी यांनी अद्यापही शिक्षकांची माहिती दिली नाही.
‘त्या’ केंद्रप्रमुख पदोन्नतीची चौकशी करावी
राहुरीतील एका केंद्रप्रमुखाने विस्तार अधिकारी पदाची पदोन्नती घेताना कारवाई लपवली होती. आता संबंधित मुख्याध्यापकांना मागे केंद्रप्रमुख पदोन्नती देण्यापूर्वी तत्कालिन गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्यावर चौकशी करून कारवाईचा अहवाल शिक्षणाधिकार्यांकडे पाठवला होता. मात्र तेथून त्या अहवालाला पाय फुटले. पदोन्नतीवेळी त्याचीही माहिती दडवून ठेवण्यात आल्याने त्यांना केंद्रप्रमुख पदोन्नती देता आली. त्यामुळे याप्रकरणात शिक्षणाधिकारी यांच्यासह जबाबदार सर्वांची चौकशी व्हावी, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही उंडे यांनी दिला.