आमदार आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा इलाका असणाऱ्या 14 नंबर वार्डाकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. महायुती होवो किंवा न होवो या वार्डातील चारही नगरसेवक हे राष्ट्रवादीचेच उमेदवार असणार असल्याचा दावा केला जातो.
गत पंचवार्षिकला भाजप व शिवसेनेने (एकत्रित) राष्ट्रवादी विरोधात उमेदवार दिले होते. यंदा मात्र शिवसेनेची विभागणी झाल्याने अन् भाजप महायुतीचा घटकपक्ष असल्याने राष्ट्रवादी विरोधात उमेदवारी कोणाला? याचीच जास्त उत्सुकता लागल्याचे चित्र आहे. (Latest Ahilyanagar News)
माजी उपमहापौर गणेश पुंडलिक भोसले हे सलग पाच टर्म नगरसेवक राहिले. दोन वेळेस शिवसेनेच्या धनुष्य बाणावर, दोन वेळेस मनसेचे इंजिन घेतलेले भोसले आता राष्ट्रवादीत असून आ. संग्राम जगताप यांचे निष्ठावंत समर्थक आहेत.
आमदार मिसेस शीतल जगताप, मीना संजय चोपडा आणि प्रकाश भागानगरे अशा चौघांनी गतवेळेस राष्ट्रवादीचे वार्ड प्रतिनिधीत्व केले. नव्या प्रारूप प्रभाग रचनेत या वार्डाला किंचितसा धक्का लागला. नव्याने काहीही न जोडता या वार्डाचा शांतीनगर, केदार वस्तीचा भाग तोडून तो 13 नंबर वार्डाला जोडण्यात आला, इतकाच काय तो बदल झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचा इलाका म्हणून ओळखला जाणारा वार्ड नव्या रचनेतही कायम राहिला.
इलाक्यात घड्याळ हाती बांधण्यासाठी इच्छुकांची रिघ लागली आहे. मात्र उमेदवारी कोणाला याचा निर्णय सर्वेसर्वा आ. संग्राम जगताप घेणार असले तरी ते याची जबाबदारी गणेश भोसले यांच्यावरच सोपवतील, असे चित्र आहे.
14 नंबरच्या वार्डातील सुमारे हजार मतदान हे 13 नंबर वार्डाला जोडले गेल्याने या वार्डाचा प्रभाव त्याही वार्डावर असणार आहे. गत पंचवार्षिकला गणेश गोसले यांच्या विरोधात शैलेश गांधी (शिवसेना), भाजपचे सुनील ठोकळ यांनी तर शीतल जगताप यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुरेखा भोसले, संगीता गांधी (भाजप) यांची उमेदवारी केली होती. भोसले व जगताप यांनी मोठ्या मताधिक्याने विरोधकांचा पराभव करत विजयी गुलाल घेतला.
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा पराभव करत प्रकाश भागानगरे निसटत्या मतांनी (अवघ्या 125) विजयी झाले. गत पाच वर्षांच्या कार्यकाळात गणेश भोसले यांनी महापालिका आणि आमदार निधीतून कोट्यधवी रुपयांची कामे करत या वार्डाची भक्कम बांधणी केली आहे. उद्यान आणि महापालिकेचा दवाखानाही याच भागात अन् सोबतीला जनसंपर्क या भोसले म्हणजेच राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजू आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार कोण यापेक्षा घड्याळाचा इलाका असणाऱ्या भागात त्यांच्यावोिधात कोण याचीच जास्त उत्सुकता लागून असणार आहे.
राष्ट्रवादी उमेदवार बदलणार?
राष्ट्रवादीकडून माजी उपमहापौर गणेश भोसले यांची उमेदवारी निश्चित आहेच, त्यांच्या जोडीला प्रकाश भागानगरे यांचेही नाव अंतिम मानले जाते. आ. जगताप यांच्या मिसेस शीतल आणि मीना संजय चोपडा यांच्या उमेदवारीबाबत मात्र अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. होमग्राऊंड असलेल्या वार्डात उमेदवारीचा निर्णय मात्र सर्वेसर्वा आ. संग्राम जगताप हेच घेणार असल्याने वार्डातील उमेदवारीबाबत उत्सुकता लागून असणार आहे.
उबाठा ‘भगवान’ भरोसे
शिवसेनेच्या विभागणीनंतर बहुतांश माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र माजी महापौर भगवान फुलसौंदर अजूनही उबाठा सेनेतच आहे. उबाठा सेनेतही ते फारसे सक्रिय दिसत नसले तरी महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. उबाठा सेनेची सगळी भिस्त ‘भगवान’ भरोसे असली तरी ते मशाला घेऊन इलेक्शनच्या आखाड्यात उतरणार की धनुष्यबाणाने वेध घेत महापालिका सभागृहात पोहचणार याची उत्सुकता आहे. फुलसौंदर यांनी धनुष्यबाण हाती घेतला तरी आ. संग्राम जगताप यांची ‘एनओसी’ आवश्यक असेल, ही खरेच!