High Speed Rail Pudhari
अहिल्यानगर

High Speed Rail: नाशिक-पुणे अन्‌ राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या स्टेशनात

शिष्टमंडळ आज घेणार भेट : राधाकृष्ण विखे पाटील

पुढारी वृत्तसेवा

नगर: नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रश्नाच्या संदर्भात नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (दि. १ जुलै) भेट घेऊन त्यांच्याकडे चर्चा करणार आहे.

केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून याबाबत यशस्वी तोडगा काढण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत सांगितले.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. सर्व आमदार माणिकराव कोकाटे, शरद सोनवणे, बाबाजी काळे, विठ्ठलराव लंघे, शिवाजी आढळराव पाटील, सत्यजित तांबे, प्राजक्त तनपुरे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले आदी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

मंत्री विखे पाटील म्हणाले, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सोबतही या रेल्वे मार्गाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेईल. हा रेल्वे मार्ग नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

या रेल्वेमार्गामुळे एक वेगवान संपर्क जोडणी पुणे ते नाशिक या दोन महानगरांदरम्यान निर्माण होईल. त्यामुळे राज्याचाही गतीने विकास होईल. पुणे नासिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत जनतेच्या भावना विचारात घेऊन या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाच्या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या असलेल्या भावना मुख्यमंत्र्याच्या निदर्शानास आणून देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आ. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असून जीएमआरटीच्या अडचणी दूर होऊ शकतात, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

काही देशांमध्ये अशा पद्धतीच्या अडचणी असताना रेल्वेमार्गाची कामे झाल्याचा दाखला देऊन यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेण्याची सूचना त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT