कोळपेवाडी: ज्यांना पाच वर्षे आमदारकी समजण्यातचं गेले. त्यामुळे त्यांना जनतेच्या समस्या, अडचणी काय आहेत, हे कधी समजलेचं नाही. त्यांनी पोहेगाव व जवळके ही गावे कोपरगाव पोलिस स्टेशनला जोडण्याचे श्रेय घ्यायचे सोडाच, पण त्यावर प्रतिक्रिया देणेसुद्धा हास्यास्पद आहे.
ज्या व्यक्तीचा पोहेगावसह जवळके ही गावे कोपरगाव पोलिस स्टेशनला जोडण्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा व्यक्तीच्या नावाने प्रेस नोट काढून, त्यांनी स्वतःच्या बुद्धीचे दिवाळे काढले आहे, असे सांगत, विरोधकांची वायफळ बडबड म्हणजे निवडणुका जवळ आल्या. जनतेने काय ते समजून घ्यावे, अशी मार्मिक टीका पोहेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर औताडे यांनी कोल्हे यांच्याविरुद्ध केली आहे. (Latest Ahilyanagar News)
चांदेकसारे गटातील पोहेगाव खु., पोहेगाव बु. व जवळके ही गावे शिर्डी पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात असल्यामुळे नागरीकांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अडचणींची दखल घेवून, आमदार आशुतोष काळे यांनी, सातत्याने शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून पोहेगाव खु., पोहेगाव बु. व जवळके ही गावे कोपरगाव पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात आली आहेत.
परंतू आपण प्रवाहाबाहेर तर लोटले जाणार नाही ना, या भितीपोटी कोल्हे गटाने, ज्याचा याबाबत कुठलाही संबंध नाही, अशा कार्यकर्त्याच्या नावे प्रेसनोट देवून टीका केली. त्या टीकेचा अतिशय मुद्देसूद व मार्मिक शब्दात समाचार घेताना नंदकिशोर औताडे यांनी कोल्हे यांना खडे बोल सुनावले आहेत.
औताडे म्हणाले, 2020 पासून आमदार काळे यांनी, शिर्डी पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील पोहेगाव खु., पोहेगाव बु. व जवळके ही गावे कोपरगाव पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात घेण्याबाबत पाठपुरावा केला. यासाठी जुलै 2020मध्ये तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले होते. सप्टेबर 2022 मध्ये आमदार काळे यांनी, तत्कालिन गृहमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.
गावांचा ठराव मंजूरीसह शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या संमती पत्रासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत पोलिस महासंचालक कार्यालयाकडे अहवाल सादर केल्याचे नमूद केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले होते.
अखेर आमदार काळे यांच्या अथक पाठपुराव्याला यश येवून, पोहेगाव खु., पोहेगाव बु. व जवळके ही गावे कोपरगाव पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात वर्ग झाली, परंतू खोटे बोल, पण रेटून बोल, ही ज्यांना सवय आहे. त्यांना जिकडे- तिकडे फक्त श्रेयच दिसते. काडीचा संबंध नसतानाही हे काम आमच्यामुळेचं झाले, असे ते सांगून, जनतेची दिशाभूल करतात, अशी टीका औताडे यांनी केली आहे.
‘विरोधक एवढे सैरभैर झाले आहेत. दैनंदिन वापरातील कुंभारी-मढी रस्ता त्यांची सत्ता असताना त्यांच्याच नेत्याने तो नकाशावरचं नसल्याचे त्या कार्यकर्त्याला सांगितले होते. त्याच रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी 6.09 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून, विकास कामे करणारे आमदार काळे यांच्यावर टीका करण्याचे कारण नसताना आपल्या नावाचा केलेला वापर या कार्यकर्त्यालासुद्धा खटकला असू शकतो.-नंदकिशोर औताडे, पोहेगाव, (ता. कोपरगाव) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य.