जामखेड: गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सर्वत्रच शेतीसह जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. खैरी मध्यम प्रकल्प, मोहरी, धोंडपारगाव व मुंजेवाडी तलावातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने परिसरातील अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
जवळा येथील नांदणी नदीला महापूर आल्याने त्या पुराची पाहणी करण्यासाठी प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी भेट देऊन उपाययोजना केल्या असून, पूर परिस्थिती गंभीर झाली, तर नदीजवळील कुटुंबांना राहण्यासाठी जवळा येथील भक्त निवास व नवीन ग्रामपंचायत येथे पर्यायी जागा उपलब्ध केली आहे. (Latest Ahilyanagar News)
रात्री झालेल्या मुसळधार पावसाने खैरी मध्यम प्रकल्प, मोहरी, धोंडपारगाव, मुंजेवाडी तलावातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने त्या खाली राहणाऱ्या परिसरातील शेती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नांदणी नदीचे पात्र 100 मीटरपर्यंत बाजूच्या शेतांतून पाणी वाहत असून, पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती.
तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असून, पुलावरून पाणी वाहत आहे. शेती खणून गेल्या असून, पिके पाण्यात आहेत. अनेक तलावांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जनावरे पावसामुळे मृत्यू पावत आहेत. लेहनेवाडी येथे शरद पवार यांच्या 7 शेळ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडलांत सरासरी ओलांडली आहे. यामुळे अगोदरच ओव्हर-फ्लो असलेला मध्यम प्रकल्प, तलाव, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरले आहे. खैरी नदीला पूर आला आहे. दरडवाडी, तसेच आनंदवाडीचा पूल बंद आहे. यामुळे जामखेड-खर्डा वाहतूक दुपारपर्यंत बंद होती.
जामखेड-खर्डा वाहतूक बंद,लेहेनेवाडी येथे 7 शेळ्या मृत्यूमुखीखैरी मध्यम प्रकल्प, मोहरी,धोंडपारगाव, मुंजेवाडी तलावातून विसर्ग दूधसंकलन निम्म्यावर जवळा, बोर्ले, नान्नज, परिसरात मोठ्या प्रमाणात दूधउत्पादक शेतकरी असून, रस्त्यावर पूरपरिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना दूध डेअरीऐवजी दूध ओतून देण्याची वेळ आली. जवळा गावातील अनेक दूध संकलन केंद्रांमध्ये दूध संकलन निम्म्यावर आले होते.