शिष्यवृत्ती परीक्षेत नगरचा टक्का pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Education: शिष्यवृत्ती परीक्षेत नगरचा टक्का वाढला; पाचवीचे 9656, तर आठवीचे 4440 विद्यार्थी उत्तीर्ण

गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी इयत्ता पाचवीच्या निकालात 6.54 टक्के व इयत्ता आठवीच्या निकालात देखील 6.24 टक्के ने वाढ

पुढारी वृत्तसेवा

नगर : अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्व व्यवस्थापनाचा इयत्ता पाचवीचा निकाल 28.53 टक्के व इयत्ता आठवीचा निकाल 20.49 टक्के लागला आहे. राज्याच्या इयता पाचवी व आठवीच्या सरासरी निकालापेक्षा हा निकाल अनुक्रमे 4.63 व 1.18 टक्केने जास्त असल्याचा दावा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत दि. 9 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वीचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

जिल्हा परिषद शाळांचा इयत्ता पाचवीचा निकाल 36.44 टक्के असून इयत्ता आठवीचा निकाल 14.75 टक्के आहे. गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी इयत्ता पाचवीच्या निकालात 6.54 टक्के व इयत्ता आठवीच्या निकालात देखील 6.24 टक्के ने वाढ झाली आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नगरच्या इयत्ता पाचवीचे जि प शाळेचे 1066 विद्यार्थी जास्त पात्र झाले असून एकूण 4393 विद्यार्थी पात्र झाले आहेत. तर गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत इयत्ता आठवीचे जि प शाळेचे 69 विद्यार्थी जास्त पात्र झाले असून एकुण 158 विद्यार्थी पात्र झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांच्या नियोजनातून मिशन आरंभ उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या सराव चाचण्यांचा फायदा झाल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. वर्ष 2024-25 मध्ये परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8 वीसाठी एकुण 11 सराव चाचण्या घेण्यात आल्या पैकी 2 सराव चाचण्या ऑनलाईन स्वरुपात, 4 सराव चाचण्या शाळा स्तरावर व 5 सराव चाचण्या परीक्षा केंद्र निर्माण करून घेण्यात आल्या. तसेच वर्षभर ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. त्याचीच फलनिष्पती या निकालातून स्पष्ट होते.

या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे सर्व व्यवस्थापनाचे एकूण 34570 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी 33845 विद्यार्थी उपस्थित होते व 9655 विद्यार्थी (28.53%) पात्र झाले आहेत. इयत्ता आठवीचे एकूण 22070 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 21672 विद्यार्थी उपस्थित होते. पैकी 4440 विद्यार्थी (20.49 टक्के) पात्र ठरले आहेत

निकालामध्ये कोपरगाव तालुक्याचा इयता पाचवीचा निकाल सर्वाधिक 47.37 टक्के असून इयत्ता आठवीमध्ये सर्वाधिक निकाल पारनेर तालुक्याचा 32.33 टक्के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT