नागरदेवळे येथील स्मशानभूमीची दुरवस्था Pudhari
अहिल्यानगर

Nagardevale Crematorium: नागरदेवळे येथील स्मशानभूमीची दुरवस्था

दुरुस्ती न झाल्यास अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोर: जालिंदर बोरुडे

पुढारी वृत्तसेवा

नगर: तालुक्यातील नागरदेवळे गावची स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पावसाळ्यात तेथे अंत्यविधी करणे ग्रामस्थांसाठी मोठ्या अडचणीचे ठरत आहे. या प्रश्नावर लक्ष वेधत स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतने तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे व ग्रामस्थांनी केली आहे. 15 दिवसांत काम पूर्ण झाले नाही, तर येथून पुढे सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभामंडपात होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरदेवळे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी असलेला पत्र्याचा शेड पूर्णतः जीर्ण झाला आहे. त्याला जागोजागी खड्डे पडले असून, पावसात त्या ठिकाणी अंतिम संस्कार करणे अशक्य झाले आहे. (Latest Ahilyanagar News)

पावसाच्या दरम्यान एखादा अंत्यविधी करावयचा असल्यास पाऊस संपेपर्यंत ती अंत्ययात्रा ग्रामपंचायतीसमोरील सभा मंडपात थांबवावी लागते, मग पाऊस बंद झाल्यानंतर अंत्यविधीची प्रक्रिया करावी लागत आहे. दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून, तो अधिकच बिकट बनत चालला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

याशिवाय, स्मशानभूमीत बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही. नागरिकांना उभे राहून अंत्यसंस्काराला थांबावे लागते. रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे आणखी अडचणी निर्माण होतात. अशा दुःखद प्रसंगात लोकांना सुविधा नसल्यामुळे मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

नव्याने पत्र्याचे मजबूत व पावसापासून संरक्षण करणारे शेड उभारावे, लाईटची योग्य व्यवस्था करण्यात यावी, दशक्रिया विधीसाठी ओटे व त्यावर शेडची व्यवस्था करावी, स्मशानभूमीला गेट उभारावे व परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवावे, अंत्यविधी आणि दशक्रिया करताना पाण्याची सोय उपलब्ध करावी, संपूर्ण परिसराची स्वच्छता व नियमित देखभाल करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सागर खरपुडे हेदेखील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनाने येत्या 15 दिवसांत सदरचे काम मार्गी लावावे. अन्यथा यापुढील सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभामंडपात केले जाणार आहेत.
- जालिंदर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT