नगर : जिल्हा परिषदेच्या अग्नीशमन यंत्र खरेदीमध्ये मोठा गोंधळ असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. झेडपीतून एका नगासाठी 10 हजार 397 रुपये मोजले आहेत. मात्र त्याच अग्नीशमन यंत्राची बाजारात 3200 ते 4500 रुपये इतकी किंमत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्धारीत रेटचे भांडवल करून ‘त्या’ दरानेच खरेदी करत यात सुमारे 50 लाख रुपये वाढीव मोजल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे ए वन नको असतानाही केले, मात्र ते करतानाही नियम पायदळी तुडवल्याचे दिसते आहे.
जिल्हा परिषदेने सुमारे 1.50 कोटी खर्च करून 510 आरोग्य उपकेंद्रांत प्रत्येकी तीन अग्नीशमन यंत्र खरेदी केेले आहेत. ही खरेदी करताना ए वन पद्धतीने केली आहे. जीईएम पोर्टलवर अग्नीशमन यंत्र उपलब्ध असतानाही ही खरेदी ए वन करणे हे कोडे बनले आहे. असे असताना शासनाने एका अग्नीशमन यंत्राची किंमत दरपत्रकानुसार सरासरी 10 हजार रुपये ठरवून दिलेली आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तेच दर डोळ्यांसमोर ठेऊन प्रशासनाने ही खरेदी केली आहे. तसे अंदाजपत्रक तयार केले आहेत. मात्र शासनाने ज्या अग्नीशमन यंत्राची किंमत 10 हजार रुपये दाखवली आहे, ते यंत्र आयएसआय आहे, तर जिल्हा परिषदेने खरेदी केलेले यंत्रे ही वेगवेगळ्या कंपनीची स्पष्ट दिसत आहे.
याशिवाय निविदेतील स्पेशीफिकेशननुसारच काही कंपन्यांकडून कोटेशन मागवले असता त्यात एका यंत्राची किंमत ही 3200 ते 4500 रुपये अशी दिली आहे. त्यामुळे बाजारात जे एक यंत्र वरील दरानुसार मिळत असताना झेडपीने 10 हजारांना ते खरेदी का केले? असा प्रश्न पुढे येत आहे. बाजारपेठेतील किंमती लक्षात न घेता सरकारी रेट डोळ्यांसमोर ठेऊन ही खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे या खरेदीतून जिल्हा परिषदेला सुमारे 50 लाख रुपये अधिकचे मोजावे लागल्याचे आकडे सांगत आहे. याबाबत आता प्रशासनाने स्पष्टीकरण देणे गरजेचे बनले आहे.
आरोग्य विभागाला अग्नीशामक यंत्र आवश्यक आहेत, ते घेतले हे चांगलेच. मात्र ते घेताना ए वन का करावी वाटली, जीईएमवर का खरेदी केले नाही, याचे उत्तर जिल्हा परिषदेचे दोन्ही कार्यकारी अभियंता आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी द्यावे. जनतेला तरी कळू द्या, नेमके चाललयं काय? असे नगर पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांनी सांगितले.
पदाधिकारी नसल्याने जिल्हा परिषदेवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. मनमानी कारभार सुरू आहे. अग्निशमन यंत्र खरेदी ही जीईएम पोर्टलवरून करणे अभिप्रेत होते. मुळातच या तीन वर्षातील सर्व खरेदीची चौकशी व्हायला पाहिजे. या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली.
जिल्हा परिषदेत अधिकारी राज सुरू आहे. वाटेल ते नियम बनवायचे आणि वाटेल तिथे वापरायचे. अग्निशमन यंत्राची खरेदीची एकच प्रमा हवी होती. यांनी शासन नियम मोडीत काढले आहेत. याची चौकशी झालीच पाहिजे. ही खरेदी रद्द करा अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करू, असा इशारा जि.प.बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी दिला.
दरम्यान, शासनाच्या रेटनुसारच ही खरेदी केलेली आहे. तसेच 67 हजार 500 रुपयांच्या खाली ही खरेदी असल्याने जीईएमऐवजी ती ए वन केली आहे. बाजारभाव आणि शासनाचे रेट यामध्ये मोठी तफावत असल्याचे खरे आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून पुढील खरेदी ही बाजारपेठेतील दरानुसार कशी करता येईल, याबाबत प्रयत्न केला जाईल, असे कार्यकारी अभियंता सागर चौधरी म्हणाले.