कांदा आगर म्हणून नगर तालुक्याची नव्याने ओळख! लाल कांदा लागवडीला प्रारंभ Pudhari
अहिल्यानगर

Red Onion Farming: कांदा आगर म्हणून नगर तालुक्याची नव्याने ओळख! लाल कांदा लागवडीला प्रारंभ

वखारीतील कांद्याला भावाची प्रतीक्षा; शेतकऱ्यांमध्ये धाकधूक

पुढारी वृत्तसेवा

Red onion farming started in Nagar taluka

शशिकांत पवार

नगर तालुका: राज्यात ज्वारीचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या अहिल्यानगर तालुक्यात गेल्या दोन दशकांपासून कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. विक्रमी कांदा उत्पादनामुळे तालुक्याला ‌‘कांद्याचे पठार‌’ म्हणून नव्याने ओळख मिळत आहे. गावरान कांदा, रांगडा कांदा, तसेच लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन तालुक्यात होत आहे. सद्यःस्थितीत लाल कांदा लागवडीची लगबग सुरू असल्याचे दिसून येते.

तालुक्यातील शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने येथील शेती व्यवसाय संपूर्णतः निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली, तर बळिराजा आनंदात असतो. परंतु वातावरणाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच बसत असल्याचे पहावयास मिळते. अवकाळी, ढगाळ वातावरण, धुके अन्‌‍ पाण्याची कमतरता यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नेहमीच आर्थिक संकट उभे ठाकते.  (Latest Ahilyanagar News)

शेतकऱ्यांची खरी ‌‘मदार‌’ रब्बी हंगामातील पिके असून, त्यातच विशेष करून कांदा पिकावर अवलंबून असते. संपूर्ण आर्थिक गणित, तसेच वार्षिक खर्चाचे नियोजन कांदा पिकावरच अवलंबून असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

कांदा पीक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. त्यातच वातावरणात झालेल्या बदलाने कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे खते, महागड्या औषधांची फवारणी यामुळे शेतकऱ्यांसमोरील खर्च वाढत असतो. तरीही शाश्वत उत्पन्नाची हमी नसते तसेच कांद्याच्या दराबाबतही शाश्वती नसते. कांदा पीक एक प्रकारे जुगारच असल्याचे शेतकरी मानतात.

चालू वर्षी तालुक्यात असणाऱ्या 110 गावांपैकी जवळपास सर्वच महसूल मंडलांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाणही अत्यल्प राहिल्याने पाणी टिकणार की नाही याबाबतही शेतकऱ्यांमध्ये शंका आहे. तरी आगामी नवरात्र काळात वरुणराजा कृपा करेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

भौगोलिक संरचनेनुसार तालुक्यातील बहुतांशी क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने लाल कांद्यासाठी पोषक वातावरण असते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत लाल कांद्याची गुणवत्ता व उत्पादन जास्त होत असते. त्यामुळे तालुक्यातील लाल कांद्याला बाजारात मोठी मागणीही असते. परंतु हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

जेऊर, वाळकी, चिचोंडी पाटील, देहरे, सारोळा कासार, अकोळनेर, ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, डोंगरगण, हिंगणगाव, जखणगाव, पांगरमल, रुईछत्तिशी, खडकी, भोरवाडी, आगडगाव, रांजणी, माथणी, देवगाव या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असते. तालुक्यात लाल कांदा लागवडीची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे.

शेतकरी सापडला दुहेरी संकटात!

सप्टेंबर महिना सुरू झाला असला, तरी अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांकडे वखारीत साठवून ठेवलेला गावरान कांदा तसाच पडून आहे. बाजारात कांद्याला भाव मिळत नसल्याने झालेला खर्च वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी कांदा विकत नाही. वखारीतही मोठ्या प्रमाणात कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. कांदा ठेवावा तर खराब होत आहे अन्‌‍ बाजारात पाठवावा तर कवडीमोल भावाने विकावा लागतो अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

दोन एकर लाल कांदा लागवड केली आहे. बियाणे, मशागत, खते, लागवड यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. उत्पादन हाती येईपर्यंत शाश्वती नाही. कांद्याच्या दराबाबतही शंका आहे. साधारणपणे एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असून, उत्पादन व बाजारभाव न मिळाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो.
- सुधीर पवार, शेतकरी, जेऊर
कांदा लागवड केल्यानंतर कलम जळून जाण्याचा प्रकार पाहावयास मिळतो. मर, सड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उच्च दर्जाच्या बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी अथवा जमिनीतून बुरशीनाशक औषध सोडावे. पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे.
- शुभम मोढवे, कृषितज्ज्ञ, बळिराजा कृषी सेवा केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT