Ahilyanagar: ‘कमळा’च्या तळ्यात घड्याळाची टिकटिक?

भाजपला नवखा चेहरा समोर आणावा लागेल
Ahilyanagar BJP
BJP File Photo
Published on
Updated on

संदीप रोडे

नव्या प्रारूप प्रभाग रचनेत माजी महापौर बाबासाहेब वाकळेंना धक्का देत त्यांच्या जुन्या वार्डातून तुटलेला भाग जोडून आणि सहकारनगर परिसराचा भाग तोडून नवीन सहा नंबर वार्डाची निर्मिती करण्यात आली आहे. हा प्रभाग तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गतवेळी भाजपचे चारही नगरसेवक या वार्डातून विजयी होत कमळ फुलले होते. नव्या वार्डाची रचना पाहता माजी नगरसेविका आशा कराळे आणि भैय्या गंधे हे तीन नंबर वार्डांतून लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. त्यामुळे भाजपला नवखा चेहरा समोर आणावा लागेल. हीच संधी साधत विजयाची खात्री असलेल्या या वार्डात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाजली तर नवल वाटू नये!

मनोज दुल्लम, सोनाबाई तायगा शिंदे, आशा कराळे आणि भैय्या गंधे हे चारही भाजपचे नगरसेवक मागील सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते. नव्या रचनेनंतर यातील भैय्या गंधे आणि आशा कराळे यांनी तीन नंबरमधून चाचपणी सुरू केली आहे. आशा कराळे ऐवजी त्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारी करणार असले तरी आरक्षणानंतरच त्यासंदर्भात निर्णय होणार आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सहा नंबर वार्डात गंधे आणि कराळे यांची तीन नंबर वार्डातील चाचपणी पाहता भाजपला येथे दोन नवे चेहरे शोधावे लागणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका वीणा श्रीनिवास बोज्जा याच वार्डातून लढण्याची तयारी करत आहेत. साहित्यिक जयंत येलुलकरही याच वार्डात राहतात. तेही लढण्याची तयारी करत असले तरी त्यांचा पक्ष अजून ठरलेला नाही.

बोज्जा आणि येलुलकर हे दोघेही गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून लढले अन् पराभूत झाले. आता मात्र ते सावध पाऊल टाकत राष्ट्रवादीकडून लढण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांचेच निकटवर्तीय करत आहेत. योगेश सोनवणे यांना दोन वेळा नगरसेवकपदाने हुलकावणी दिली. वार्डातील त्यांचा संपर्क पाहता ते लढतील, अशी शक्यता वर्तविली जाते, पण त्यांचा पक्ष कोणता हे निश्चित नाही. राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त करणारे चांगले चेहरे या वार्डात आहे. त्यामुळे भाजपला नवा चेहरा देण्यापेक्षा राष्ट्रवादी दोन जागांवर दावा करून विजयाची खात्री असलेल्या वार्डात घड्याळाची टिकटिक वाजली तर नवल वाटू नये. डॉ. सुजय विखे पाटील आणि आ. संग्राम जगताप यांचे ‘मैत्रीपर्व’ पाहता हे अशक्य नाही. महायुती होवो की आणखी काही निर्णय होवो, या वार्डात घड्याळ दिसल्यास आश्चर्य वाटू नये इतकेच. गत निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत या वार्डातील चारही जागा काँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भाजपप्रेमी मतदार असलेल्या या वार्डातून आ. संग्राम जगताप यांना विधानसभेला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीची मदार या वार्डावर असणार हे नक्की.

शेजारच्या एक नंबर वार्डात राष्ट्रवादीचा वरचष्मा आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांचा संपर्क पाहता सहा नंबर वार्डात घड्याळाची टिकटिक अशक्य नाही. महायुती झाली अन् त्यातील जागा वाटपापेक्षाही ‘विखे-जगताप’ मैत्रीपर्व पाहता टिकटिक जोरात वाजेल, असे चित्र समोर येऊ पाहते आहे.

या वार्डातील श्रमिकनगर, वैदूवाडी आणि पोलिस कॉलनीमधील मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत. येथे माजी नगरसेविका सोनाबाई शिंदे व मनोज दुल्लम यांचे याच भागावरील प्रभुत्व पाहता त्यांची उमेदवारी भाजपकडून पुन्हा निश्चित मानली जाते. शिंदे यांच्या कुटुंबातील तायगा शिंदे हे माजी नगरसेवक आहेत, तर सतीश शिंदे हे विखेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांचा संपर्कही दांडगा असल्याने त्यांच्यावरच अन्य दोन कोण? हे सुचविण्याची वेळ येईल, असे दिसते.

नव्या वार्ड रचनेत सहकारनगर, अभियंता कॉलनी, प्रोफेसर कॉलनी चौकातील काही भाग वगळण्यात आला आहे. तर माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वार्डातील अमित बँक कॉलनी, रासनेनगर, श्रीनाथ कॉलनी, वेदांतनगर, सेंट मोनिका शाळा परिसर, प्रेमदान हडको हा भाग तोडून तो नव्या सहा नंबर वार्डाला जोडण्यात आला आहे. जुन्या वार्डातून तोडलेला हा भाग तोडताना माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना धक्का मानला जातो.

काँग्रेसचा ‘हात’ आखडता

गत पंचवार्षिकला काँग्रेसने या वार्डातील चारही जागा लढविल्या होत्या. पुढे लोकसभेला विखेंना तर विधानसभेला जगतापांना मिळालेले मताधिक्य पाहता काँग्रेसकडून इच्छुक असलेले पुढे येतीलच असे दिसत नाही. काँग्रेसला उमेदवारीसाठी शोधाशोध करणे म्हणजे ‘हात आखडता’ झाल्याचे लक्षण मानले जाते. महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता पाहता येथून शिवसेना (उबाठा) उमेदवारी देईल, असे चित्र आहे.

कराळे, गंधे, शेळकेही तीन नंबरमध्ये!

आशा कराळे, भैय्या गंधे (दोघेही भाजप) आणि कलावती शेळके (शिंदेसेना) हे तीन नंबर वार्डात चाचपणी करत आहेत. गतवेळी दिलेले शब्द व तेथील मतदारांचा कल पाहता त्यांनी सहा सोडून तीनचा पर्याय निवडल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या विभागणीनंतर काका शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. कराळे, गंधे आणि शेळके तिघे एकत्र आले अन् त्यांची चाचपणी पाहता ते तीन नंबरचा पर्याय निवडतील असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news