नगर: जिल्ह्यातील विविध भागांना शुक्रवारी (दि.22) रात्री व शनिवारी (दि.23) सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पावसाने तडाखा बसला. यावेळी नगर तालुक्यासह कोपरगाव, राहुरी, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात काहीभागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांची पत्रे उडाली असून भिंती कोसळल्या आहे. काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली.
अनेक भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाने कांदापिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. महसूल विभाग नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत असून प्राथमिक पंचनामे सुरू केले आहेत. कोपरगाव तालुक्यात कासली येथे मनोज देवराम पवार यांच्या घराच्या छताचे, भिंतींचे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. वेस येथे भगवान नाना माळी यांच्या घरावरील पत्रे उडाल्याचे मोठे नुकसान झाले.
कोळगावमध्ये फळबागांच नुकसान
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब, आंबा, जांभूळ, लिंबू, पेरू, चिकू, अशा विविध फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले फ्लेक्सचे चॅनेल वाकले असून काही उखडून पडले आहेत. झालेल्या नुकसानीची पाहणी सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच विलास शितोळे, मंडल कृषी अधिकारी निंबाळकर, तलाठी, ग्रा.पं. सदस्य जयराज लगड, महेंद्र रणसिंग यांनी केली आहे.
भेंड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी
मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी शनिवारी (दि.23) सायंकाळी भेंडा - कुकाणा परिसरात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. नेवासा तालुक्यातील कुकाणा, अंतरवाली, चिलेखनवाडी, वडुले, जेऊर हैबती, देवगाव,भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, सौंदळा, नजिक चिंचोली, गोंडेगाव, तरवडी आदी परिसरात जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
झाड पडल्याने वारणवाडी-पोखरी रस्ता बंद
पारनेर तालुक्यात जवळा व उत्तर भागातील वारणवाडी आणि पोखरी परिसराला वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने परिसरातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. वादळामुळे पोखरी व वारणवाडी रस्त्यावर एक मोठे बाभळीचे झाड मुळासकट पडले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता.