Nagar Manmad Highway Traffic Pudhari
अहिल्यानगर

Nagar Manmad Highway Traffic: नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; रस्त्याच्या कामामुळे प्रवासी त्रस्त

पर्यायी मार्गाचा अभाव, ठेकेदाराची बेफिकिरी आणि प्रशासनाची ढिलाई; वाहनचालकांची रोजची डोकेदुखी

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: नगर-मनमाड राष्ट्रीय राज्य महामार्गावरील रस्त्याचे काम आणि वाहतूक व्यवस्थापनाचा गोंधळ आता इतका वाढला आहे की, हा मार्ग प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी ठरू लागला आहे. ठेकेदाराची बेफिकिरी आणि प्रशासनाची ढिम्म भूमिका, यामुळे वाहनचालक अक्षरशः वाहतूक कोंडीत अडकून मेटाकुटीला येत आहेत. रस्त्याचे काम सुरू असताना पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे ही प्राथमिक जबाबदारी असते.

मात्र नगर-मनमाड महामार्गावर याकडे अक्षरशः ‌‘डोळेझाक‌’ करण्यात आल्याचे दिसते. संपूर्ण वाहतूक एकाच अरुंद मार्गावरून सुरू असल्याने दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सकाळी सुरू झालेली कोंडी दुपारपर्यंत आणि दुपारची कोंडी संध्याकाळपर्यंत अशीच सुरू राहते. प्रवाशांचा वेळ, इंधन आणि संयम तिन्ही गोष्टींचा ‌‘अगदी चक्काचूर‌’ होत आहे.

नगर-मनमाड महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र त्या ठिकाणी ना बॅरिकेटस, ना इशारा फलक. ठेकेदाराने खोदकाम करून ते दिवसेंदिवस तसेच सोडल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग ‌‘आगीतून फुफाट्यात‌’ जाण्यासारखा ठरत आहे. अरूंद रस्ता किंवा खड्ड्याचा अंदाज हुकताच वाहन चालक गोंधळून जातो. वाहने बंद पडतात, वाहने खड्ड्यात अडकतात, आणि काही क्षणांतच वाहतूक ठप्प होते. यात भर म्हणजे अवजड वाहनांवर निर्बंध असणे अपेक्षित असतानाही ट्रक आणि मोठी वाहने सर्रास या मार्गावरून धावत आहेत. आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर ही अवजड वाहतूक म्हणजे ‌‘जखमेवर मीठ चोळण्यासारखी‌’ परिस्थिती निर्माण करत आहे.

रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रवासी गोळा करणारे अवैध खासगी वाहतूकदार आणि रस्त्यालगतचे छोटे-मोठे व्यवसाय यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी होत आहे. मात्र यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा वाहनचालकांत सुरू आहे. एकेरी वाहतुकीच्या ठिकाणी विरुद्ध दिशेने वाहन घुसवण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे किरकोळ अपघातांची मालिका सुरू आहे. अपघात झाल्यानंतरच प्रशासन हलते, तोपर्यंत मात्र प्रवाशांना तासन्‌‍‍तास कोंडीत अडकून बसावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये ‌‘उंटावरून शेळ्या हाकण्यासारखी‌’ प्रशासनाची भूमिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

वाहतूक व्यवस्थेला उडाला बोजवारा

नगर-मनमाड महामार्गावरील कामाचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि प्रशासनातील समन्वय यांचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. ठेकेदाराचे अर्धवट काम, प्रशासनाची ढिलाई आणि पर्यायी मार्गाचा अभाव यामुळे हा महामार्ग आता प्रवाशांसाठी त्रासाचा आणि संतापाचा मार्ग ठरत आहे. या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीत तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‌‘सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही सकाळपासून प्रयत्न करत आहोत. वाहनचालकांनीही नियमांचे उल्लंघन करू नये. बेशिस्त वाहने चालवू नये.
संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT