नगर : घटस्फोटाचा दावा दाखल केल्याच्या नोटिसीमुळे संतापलेल्या पतीने पत्नीचे आणि तिच्या आईचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्यानंतर पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोलापूर महामार्गावरील दरेवाडी परिसरात शुक्रवारी (दि.28) हे अपहण नाट्य घडले. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश मोरे, रोहन पवार, सीमा पवार अशी गुन्हा झालेल्या तिघांची नावे आहेत. एमआयडीसीतील चेतना कॉलनीतील 22 वर्षीय पीडित महिलेने पतीविरुद्ध न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. याच अर्जाची नोटीस आरोपी पतीला मिळाल्याने हा सर्व प्रकार घडला.
शुक्रवारी दुपारी पीडित महिला व तिची आई मोपेड गाडीवरून जात असताना आरोपी पती ऋषिकेश मोरे व त्याचे दोन साथीदार रोहन पवार, सीमा पवार हे तिघे पांढऱ्या रंगाच्या बलेनो गाडीतून आले. त्यांनी दोन्ही महिलांना बळजबरीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.
अपहरणा दरम्यान आरोपी पतीने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आईला शिवीगाळ करून कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार कॅम्प पोलिसांत तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.