नगर: पावसाळ्यात महापालिका कार्यक्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय आपत्ती कक्ष स्थापन केले आहेत. या कक्षाला आवश्यक ती साधनसामग्री वितरित करण्यात आली आहे. पावसाचे पाणी घरादारांत पाणी शिरल्यास, इमारतीची पडझड झाल्यास तसेच साथरोग व इतर आरोग्यदायी समस्या निवारणासाठी या कक्षाची मदत होणार आहे.
आगामी चार महिने पावसाचे असून, जोरदार पाऊस झाल्यास शहर आणि परिसराची दाणादाण उडते. घरांदारांत पाणी शिरणे, झाडे पडून वाहतूक ठप्प होणे, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती कोसळणे आदी घटना पावसाळ्यात होतात. (Latest Ahilyanagar News)
अशा आणिबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तसेच नागरिकांच्या मदतीसाठी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय आपत्ती कक्ष सुरू केले आहेत. या कक्षाच्या वतीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रत्येक आपत्ती कक्षाला उपसा पंपासह आवश्यक त्या साधनसामग्री वितरित करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यकता भासल्यास महापालिकेकडे एक बोट उपलब्ध आहे. या बोटीचा वापर जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे. या प्राधिकरणाने पाचशे आपदा मित्र नियुक्त केले आहेत. त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. आवश्यकता वाटल्यास या आपदा मित्राची शहरासाठी मदत घेतली जाणार आहे.
शहरासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन झाले आहे. याच धर्तीवर मोठ्या शहरासाठी वा महापालिका कार्यक्षेत्रात शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाचा विचार सुरु आहे. त्यानुसार अहिल्यानगर महापालिका कार्यक्षेत्रासाठी प्राधिकरण स्थापन होणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे मुख्य अग्नीशमन अधिकारी शंकर मिसाळ यांनी सांगितले.