सोनई : कारखान्याची आर्थिक कार्यक्षमता वाढीसाठी येणाऱ्या हंगामात ऊसाचे जास्तीत जास्त गाळप झाले पाहिजे. त्याचबरोबर त्याचे गुणवत्तापूर्ण तांत्रिक परिणामसुद्धा मिळाले पाहिजेत, त्यासाठी कारखान्याच्या शेतकी विभागाबरोबरच तांत्रिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. म्हणून उत्पादन वाढीबरोबरच उत्पादकता वाढीसाठी सर्व कामगारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.(Latest Ahilyanagar News)
मुळा कारखान्याच्या 48 व्या ऊस गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे संचालक बाळासाहेब भाऊलाल परदेशी व त्यांच्या रेखाताई बाळासाहेब परदेशी तसेच रंगनाथ लक्ष्मण जंगले व अलका रंगनाथ जंगले यांच्या हस्ते बॉयलरची विधिवत पूजा करण्यात आली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते बॉयलरचे अग्नी प्रदीपन करण्यात आले.
गडाख म्हणाले, बहुतेक कर्मचारी कारखाना परिसरातील रहिवासी आहेत. कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्यातच गळीताला येणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. कारखान्याचे ऊस गाळप जास्त झाले पाहिजे, उतारा चांगला मिळाला पाहिजे, ऊस गाळप वाढले तर विजेचेही उत्पादन वाढेल
इथेनॉल प्रकल्पातूनही त्या प्रमाणात वाढीव उत्पादन घेता येईल, म्हणून गळीत जादा झाले तर त्याचा फायदा निश्चितच सभासदांबरोबर कामगारांनाही होईल. मात्र उत्पादनाची गुणवत्ता चांगली मिळाली पाहिजे, त्यासाठी कारखान्याचे अधिकारी आणि तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. प्रत्येकालाच आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत. कामगारांना दिवाळीपूर्वी लवकरच बोनसचे वाटप करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही गडाख यांनी जाहीर केले.