रियाज देशमुख
राहुरी : मॉन्सून परतला असला तरी अवकाळीची बरसात सुरूच आहे. मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू असल्याने नदीपात्रात 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. 2022 नंतर म्हणजेच तीन वर्षांंनी ऑक्टोबर अखेरीस नदीपात्रात मुळा धरणातून पाणी झेपावत आहे. दरम्यान, पाच वर्षानंतर यंदाच्या मोसमात मुळा धरणातून आतापर्यंत तब्बल 16 हजार 703 दलघफूट पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले. (Latest Ahilyanagar News)
यापूर्वी 2006 साली पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी ऑक्टोबर अखेरीस अवकाळी कोसळल्याने धरणातून 1 हजार क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर 2022 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण होऊन ऑक्टोबर अखेरीस 700 क्यूसेक प्रवाहाने पाणी सोडले गेले. तीन वर्षांनी यंदा 2025 मध्ये दिवाळीनंतरही अवकाळीचा कहर सुरूच आहे. परिणामी धरणात नव्याने पाणी साठा सुरू असल्याने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. रात्री 300 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग सोमवारी सकाळी 500 क्यूसेकने वाढविण्यात आला.
मुळा धरणाचा पाणीसाठा 26 हजार दलघफू स्थिर ठेवण्यात येत आहे. गत महिनाभरापासून धरणातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग वाहत आहे. मुळा पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर यंदा पर्जन्यकाळात मॉन्सून धो धो बरसला. परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला. परतीचा पाऊस माघारी गेल्यानंतरही अवकाळीने पाठ सोडलीच नाही. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले खरीप हिरावून घेतले. त्यातून सावरत शेतकरी कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा अवकाळीचा फेरा आला. मुळा धरणाच्या लाभक्षेत्र हद्दीत असलेल्या राहुरीसह संगमनेर व पारनेर धरण पट्यातही अवकाळीचा जोर दिसून आला. त्यामुळे मुळा धरणाच्या पाण्यात अचानकपणे झालेली वाढ पाहता धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली.
सोमवारी (27 ऑक्टोबर) रोजी सकाळी 7 वाजता धरणाच्या दरवाज्यावरून सायरन देत विसर्ग वाढ करण्यात आली. 300 क्यूसेक प्रवाहाच्या विसर्गात वाढ करून 500 क्यूसेक प्रवाहाने जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे.
‘मुळा’तून 9 जुलै रोजी विसर्ग सोडण्यात आला होता. 16 जुलैपर्यंत सुरू असलेल्या विसर्गातून 981 दलघफू पाणी वाहिले. पाऊस कमी झाल्याने विसर्ग थांबला होता. नंतर पुन्हा 22 ऑगस्ट रोजी विसर्ग सोडला. त्यानंतर, रविवारी रात्रीच्या वेळी अवकाळी कोसळल्याने धरणाची पाणी पातळी वाढली. त्यामुळे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे यांच्या देखरेखीत सोमवारी नदीपात्रातील विसर्ग वाढविण्यात आला.