Rainfall increases storage in Mula reservoir
राहुरी: आठवड्यापासून दडी मारलेला पाऊस सक्रिय झाला असून मुळा धरण पाणलोटात श्रावणसरी बरसल्या. पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर पुन्हा पावसाचे आगमन झाले. मुळा धरणाकडे 8 हजार 373 क्यूसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा 19 हजार 507 दशलक्ष घनफुटांवर (75 टक्के) पोहचला आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने काहीशी चिंता निर्माण झाली होती. धरण साठा मुबलक असला तरीही खरीप पेरण्यांसाठी अपेक्षित पाऊस पडत नव्हता. मुळा धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यासह वांबोरी चारीद्वारे शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला. (Latest Ahilyanagar News)
मुळा धरण साठ्याकडे केवळ 1 ते 2 हजार क्यूसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक होती. तर धरणाच्या डाव्या कालव्यातून शेती सिंचनासाठी 150 क्यूसेक तर उजव्या कालव्यातून 1100 क्यूसेक प्रवाहाने पाणी वाहत होते. दोन्ही कालव्यातून पाणी वाहत असल्याने धरण साठ्यामध्ये वाढ होत नव्हती. परंतू शुक्रवारी (दि.25) सायंकाळी धरण पाणलोट क्षेत्रावर श्रावण सरींची कृपा झाल्याने आवकेत वाढ दिसून आली.
मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड परिसरात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. कोतूळ येथील लहित खुर्द येथील मुळा सरिता मुळा धरणाच्या दिशेने 8 हजार 373 क्यूसेक प्रवाहाने वाहत असल्याची नोंद झाली. परिणामी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये नवीन पाणी जमा होण्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मुळा धरण पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावरही श्रावण सरींची कृपा दिसून आली. शुक्रवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. राहुरी परिसरामध्ये गत महिन्यापासून अपेक्षित पाऊस न पडल्याने खरीपावर संकट ओढवण्याची भीती होती. परंतू श्रावण मासारंभ सोबतच पावसाचे पुनगरागनम झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
जुलै महिन्यातच धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी अपेक्षा होती. परंतू पावसाने दडी मारल्याने 10 दिवसांपासून धरण साठा 75 टक्केच्या आसपास घुटमळत होता. सद्यस्थितीला मुळा धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहे. 16 जुलै रोजी शासनाच्या जलाशय परिचलन सुचीनुसार पाणी साठ्याचे नियोजनामुळे दरवाज्यातून सोडलेला विसर्ग थांबविण्यात आला होता. अखेरीस धरणात येणारी आवक वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा होत आहे.