चिचोंडी शिराळ: पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. पिके वाचविण्यालसाठी शेतकर्यांनी मुळा धरणातून ओव्हर फ्लो पाणी सोडण्याची मागणी केली आहे. परिसरात पाऊस कमी पडल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. या परिसरात जोरदार पावसाची गरज आहे. परंतु पाऊस होत नसल्याने मुळा धरणातील ओव्हार फ्लोचे पाणी वाया जाऊ न देता ते शेतीसाठी वापरावे, ही शेतकर्यांची प्रमुख मागणी आहे.
या भागातील शेतकरी सध्या पाणीटंचाईशी सामना करीत आहेत. चिचोंडी शिराळ परिसरातील धरणांमध्ये ओव्हर फ्लो पाणी सोडल्यास या पाण्याचा सदुपयोग होईल. मात्र, प्रशासनाकडून अद्याप याबाबत ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. (Latest Ahilyanagar News)
मुळा धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी आम्हाला वेळेत मिळाले तर खरीप हंगामावर सकारात्मक परिणाम होईल. पाऊस न झाल्यामुळे होणार्या पाण्याच्या टचणीतून धोका शेतकर्यांना टाळता येईल. त्याचबरोबर, पाणी वाया न जाता वांबोरी चारीच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील 102 तलाव भरण्याचा नियोजन करावे. ओव्हर फ्लोचे पाणी शेतीला दिलं जाईल तर आपला हंगाम वाचेल, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
मुळा धरणामध्ये पाणीसाठा चांगल्या पद्धतीने जमा झाला आहे. गेल्या दहा दिवसांत या धरणांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याचे अहवाल आहेत. ज्यामुळे त्यापासून पाणी शेतीसाठी दिले जाऊ शकते. प्रशासनाने पाणी वितरणासाठी तातडीने योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे. काही ठिकाणी या संदर्भात शेतकर्यांच्या मागण्यांवर अद्याप उत्तर नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीचे संकट टाळण्यासाठी धरणांचा जलसाठा वेळेत वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपाययोजनेमुळे कृषी उत्पादन सुधारण्यास मदत होईल, तसेच शेतकर्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल, असे शेतकर्यांना वाटते.
मुळा धरणातील ओव्हर फ्ल्हो चे पाणी तरी या या परिसराला द्या, अशी मागणी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, शिवसेनेचे नेते रफिक शेख, चेअरमन संतोष गरुड, सरपंच रवींद्र मुळे, चेअरमन पोपटराव आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गिते, मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे उपाध्यक्ष भीमराज सोनवणे, युवानेते राजेंद्र दगडखैर, राजेंद्र आंधळे, भाऊसाहेब गोरे यांनी केली आहे.