Mula River Dry Pudhari
अहिल्यानगर

Mula Dam Water Release: मुळा धरण ९५ टक्के भरले, तरी नदीपात्र कोरडेच; बंधारे भरण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

मानोरी-मांजरीसह केटीवेअरमध्ये पाणी सोडण्याची मागणी; विहिरी-बोअरवेल्स तळाला, खरीप पिके वाचविण्याचे मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

वळण: यंदा मुळा धरणाच्या पाणलोटात पुरेसा पाऊस झाला. चार दिवसांपूर्वी सुमारे 95 टक्के मुळा धरण भरताच डाव्या व उजव्या कालव्यासह वांबोरी चारीला आवर्तन सोडण्यात आले. मात्र अद्याप मुळा नदी पात्र कोरडेच आहे. त्यामुळे तातडीने नदीपात्रात पाणी सोडून मानोरी, मांजरी बंधारे भरून देण्यात यावेत, अशी मागणी लाभधारक शेतकरी वर्गातून होत आहे.

यंदा एल निनोमुळे काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी राहुरी तालुक्यातील अनेक गावात व लाभक्षेत्रात कमी पाऊस झाले. त्यामुळे जमिनीची पाणी पातळी कमालीची खालवली आहे. खरिपाची कपाशी, सोयाबीन, बाजरी, मका, तूर आदी पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक पिके पाण्यावर आली असून शेतकरी मोठ्या आशेने आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे.

जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पाणी योजना आणि सिंचन ज्या धरणावर विसंबून असते, ते मुळा धरण मात्र जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पुढील वर्षीचा पाणी प्रश्न मिटल्याचे समाधान शेतकरी वर्गासह जलसंपदा विभागातून समाधान व्यक्त होत आहे. धरण भरले असल्याने व पुढे परतीचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने आता तातडीने मुळा नदीपात्रात पाणी सोडून मानोरी, मांजरीसह अन्य बंधारे भरून द्यावेत. नदीपात्रा शेजारील व बंधाऱ्यावर विसंबून असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि हाता तोंडाशी आलेल्या खरीप पाण्यावाचून जाणार नाही, यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने तातडीने या बंधार्‍यात व नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यासह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुळा धरणातून तातडीने मुळा नदीपात्रात पाणी सोडून मानोरी व मांजरीसह इतर मुळा नदीवरील सर्व केटीवेअर तातडीने भरण्यात यावे व शेतकऱ्यांची ऐन पावसाळ्यात शेतातील उभी पिके जगवण्यासाठी होणारी धडपड थांबविण्यासाठी, पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला दूध व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी मुळा नदी पात्रात पाणी सोडून बंधारे भरणे अत्यंत गरजेचे आहे.

बोअरवेल्स, विहिरीही तळाला..

ऐन पावसाळ्यात मानोरी येथील कोल्हापूर टाईप केटीवेअर कोरडे ठाक पडले आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर विसंबून असलेल्या शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा संपत आला तरी वळण, मानोरी, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक ,चंडकापूर, पिंपरी वळण, आरडगाव आदि गाव व परिसरातील हद्दीत बोरवेल व विहिरीचे पाणीही आटले आहे. अशा परिस्थितीत उभ्या पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT