बोधेगाव: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करतानाच पारंपारिक वाद्यांचा गणेश मंडळांनी वापर करावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
गणरायाची मूर्ती स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे. तसेच गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. त्यामुळे आपला सांस्कृतिक वारसा जपला जाईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन राजळे यांनी यावेळी केले. (Latest Ahilyanagar News)
यावेळी अपर पोलिस अधीक्षक वैभव कलपुरमे म्हणाले, डीजे, जुगार व अवैध दारूविक्रीवर कारवाई होणारच मग तो कोणीही असो भेदभाव केला जाणार नाही. जुगार खेळताना तसेच डीजे वाजवताना कोणी आढळले तर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील.
याप्रसंगी पोलिस अधिकारी, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मगरे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे, नवनाथ कवडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. नीरज लांडे, दारूबंदीचे अमोल घोलप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
गणेश मंडळांसाठी आदर्श आचारसंहिता
यावेळी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर केली. ती अशी , गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, मिरवणुकीदरम्यान आपल्या मंडळातच सहभाग घ्यावा, गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबवावेत, बॅनरसाठी शेवगाव नगरपरिषदेची परवानगी घ्यावी, बॅनरवरील मजकूर कोणत्याही धार्मिक भावना दुखावणारा नसावा.
महिला व मुलींच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, ध्वनिक्षेपकासाठी परवानगी आवश्यक, सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारू नयेत, महावितरणकडून वीजकनेक्शन घ्यावे, प्रत्येक गणेश मंडळाने किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, वरील नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.