

संगमनेरः शहरातील खड्डे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, शहरातील बंद सी सी टी व्ही, डीजे लेझर लाईट बंदी, मंडळांनी शिस्त पाळावी, यासारख्या विविध विषयांवर चर्चा होऊन शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी कायदा हातात घेणार्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला.
शहर पोलिस स्टेशनच्या वतीने नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भावनात शांतता कमिटीची बैठक शुक्रवारी (दि.22) सायंकाळी पाच वाजता झाली. (Latest Ahilyanagar News)
सुरुवातीला मागील वर्षी शांतता कमिटीत सुचविलेल्या विविध सूचनाबाबत काय कारवाई करण्यात आली अशी मागणी करण्यात आली. यावर प्रशासनाने मागील इतिवृत्त वाचून दाखवले. सुरुवातीला कैलास वाकचौरे यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर तरुण व्यसनाच्या आधीन गेल्याचे सांगितले तर विश्वास मूर्तडक यांनी सीसीटीव्ही बंद असल्याने एक हजार रुपये वर्गणी काढून पोलीस स्टेशनला मदत करण्याचे सांगितले.
अमर कतारे यांनी वीज कनेक्शन देताना डिपॉझिट घेतले जाते पण ते परत मिळत नाही तर दीपक साळुंखे यांनी शांतता कमिटीचे निकष काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. किशोर पवार यांनी गणेश उत्सवाच्या ठिकाणी खड्डे बुजवणे, सह इतरही प्रश्न उपस्थित केले. शिरीष मुळे यांनी लेझर लाईट डीजेचा वापर नको.
निखिल पापडेजा यांनी वीज वाहक तारा लोंबकळत असून वाहतुकीचा प्रश्न गंभीर असा मुद्दा मांडला. इतरही पदाधिकारी सदस्यांनी डीजे चा वापर लेझर लाईट बाबत चिंता व्यक्त करून यावर बंदी आणण्याची मागणी केली. विशेषता सत्कार समित्यांची वाढती संख्या त्रासदायक असून मानाच्या गणपती मंडळांनी नियम पाळून वेळेत मिरवणूक काढली पाहिजे.
विसर्जनाच्या दिवशी ड्राय डे असतानाही मोठ्या प्रमाणावर बनावट दारू विकली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
वीज वितरण कंपनी, नगरपालिका, पोलीस स्टेशन वर नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत वाढती गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास पोलीस अपयशी ठरले. या विषयांवर चर्चा होत असताना दोन पदाधिकार्यात खाजगी विषयावरून शांतता कमिटीच्या बैठकीत जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यावर अधिकार्यानी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
प्रांत अधिकारी अरुण उंडे यांनी मंडळाच्या पदाधिकार्यांनी उपस्थित केलेले प्रश्न संबंधित विभागाने तातडीने सोडवा कुठल्याही प्रकारची हाय गय करू नका, असे सांगितले. किरकोळ बाचाबाची वगळता शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद हे एका दिवसाच्या अंतरावर असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. वाद टाळावे यासाठी गणेश मंडळांनी व ईद-ए-मिलाच्या कार्यकर्त्यांनी बसून निर्णय घ्यावे. शांतता राखून उत्सव साजरे करावे.पाच तालुक्यात 230 जणांना गणेशोत्सव काळात त्या त्या तालुक्यात प्रवेश बंदीचे प्रस्ताव पूर्ण झाले असून ते सोमवारी बजावण्यात येणार आहे.
-सोमनाथ वाकचौरे, अपर अधिक्षक