पाथर्डी : शारदीय नवरात्र महोत्सवाची मोहटा देवस्थानात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी गड सज्ज झाला आहे. राज्याच्या विविध भागांतून घटीस बसण्यासाठी महिला दाखल होत असून, येत्या सोमवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश लोणे यांच्या हस्ते घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ होईल.(Latest Ahilyanagar News)
पाथर्डीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर स्वयंभू मोहटादेवीचे स्थान आहे. देवस्थान समितीने लोकवर्गणीतून कोट्यवधी रुपये खर्चून भव्य मंदिर उभारले आहे. देशातील देवीमंदिरांपैकी सर्वात मोठ्या व आकर्षक मंदिरांपैकी एक मानले जाणारे हे मंदिर श्री यंत्रकार रचनेचे आहे.
नवरात्रात दररोज होमहवन, सप्तशती पाठ, जागर, गोंधळ, भजन, हरिपाठ यांसह नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. 22 ते 30 ऑक्टोबर रोजी रोज रात्री कीर्तन होईल. 26 ते 28 ऑक्टोबरला राष्ट्रसंत आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांची श्रीमद् देवीभागवत कथा. 30 सप्टेंबरला अष्टमी होमहवन प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते होईल. 1 ऑक्टोबरला काल्याचे कीर्तन व कावडी सोहळा.
3 ऑक्टोबरला एकादशी यात्रेत दिवसभर पालखी दर्शन, रात्री उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक, मध्यरात्री दारूगोळ्याची आतषबाजी. दि. 4 ऑक्टोबरला कलाकारांच्या हजेर्या व कुस्त्यांचा हंगामा. 6 ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेला महाआरती व दुग्धप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐंशी ते शंभर किलोमीटर अंतरावरून भाविक पायी चालत दर्शनासाठी येत आहेत. नगर-पाथर्डी मार्गावर चहापाणी, फराळ, औषधोपचार आदी मोफत सेवा सुरू आहेत. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मोहटादेवी गड परिसर हिरवाईने नटला आहे. डोंगरातील झरे, ओसंडून वाहणारे तलाव व प्रसन्न वातावरण भाविकांचे आकर्षण ठरणार आहे.
देवस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ उत्सवाचे नियोजन पाहत आहे. यात विश्वस्त पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश रविकिरण सपाटे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी संगीता पालवे, तसेच शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, श्रीराम परतानी, अॅड. कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, अॅड. विक्रम वाडेकर आदींचा सहभाग आहे.
तालुक्यातील धामणगाव देवी, दगडवाडी, तोंडोळी, वडगाव, तिसगाव, खांडगाव, रेणुकाईवाडी, कोल्हार आदी ठिकाणी तसेच पाथर्डी शहरातील देवीमंदिरे आकर्षक रोषणाईने सजविण्यात आली आहेत.
अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात
भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी भक्तनिवासापासून रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली. रस्त्याचे रुंदीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, खडीकरण व मुरमीकरण करण्यात आले आहे.