जामखेड-खर्डा: जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहरी तलावाच्या सांडव्यात मोठे भगदाड पडून पाणी वाहू लागल्याने तलाव फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. हा धोका टाळण्यासाठी आ. रोहित पवार यांनी पुढाकार घेत तातडीने स्वखर्चातून मदत पुरवली.
कालव्याच्या सांडव्यात खच झाल्याने तलावाचे पाणी परिसरातील सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर, जवळके, तरडगाव या गावांकडे झेपावण्याची शक्यता होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीची माहिती मिळताच आ. पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि प्रशासनाकडे साधनसामग्री उपलब्ध नसल्याने स्वतःच्या खर्चातून तीन पोकलेन, जेसीबी, तसेच एक हजार गोणी सिमेंटची व्यवस्था करून कामाला सुरुवात केली. (Latest Ahilyanagar News)
तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या तातडीचे दुरुस्तीचे काम सुरू असून, पावसाने उघडीप दिल्याबरोबर प्रशासनाच्या मदतीने कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.मोहरी, खर्डा, जायभायवाडी या गावांसाठी मोहरी तलावातून पाणीपुरवठा होतो.
त्याचबरोबर खालील गावांतील शेतीही याच तलावावर अवलंबून आहे. जर हा तलाव फुटला असता, तर नागरिकांपुढं पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि शेती वसाहतींवर पुराचा मोठा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. तलाव सुरक्षित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन आ. पवार यांनी दिले.