Moharram 2025 police arrangements
नगर: शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या मोहरम उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तब्बल 811 अधिकारी, कर्मचार्यांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे, तसेच मिरवणूक मार्ग हा ‘वाहन विरहीत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला असून, या मार्गावर 70 सीसीटीव्ही तसेच ड्रोन कॅमेर्यांची नजर असेल.
शनिवारी (दि. 5) रोजी मोहरम उत्सवाची सुरुवात होईल. रात्री 12 वाजता कोठला मैदानातून बडे इमाम व छोटे इमाम यांच्या सवारीची मिरवणूक निघणार आहे. रविवारी 6 जुलै रोजी मोहरम विसर्जन मिरवणूक निघून ती सावेडी येथे होणार आहे. मिरवणुकीचा मार्ग ‘नो व्हेेइकल झोन घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक अमोल भारती यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
कत्तल की रात मिरवणूक मार्ग (दि. 5)
कोठला मैदान- फलटन चौकी-बारा इमाम हवेली- मोठी सवारी समेत मंगलगेट- दाळमंडई- तेलीखुंट- कापड बाजार - शहाजी चौक- मोची गल्ली- नवा मराठा प्रेस- जुना कापड बाजार- भिंगारवाला चौक- अर्बन बँक रोड- लक्ष्मीबाई कारंजा - कोर्टची मागील बाजुस सबजेल चौक- मनपा चौक- पंचपिर चावडी- जुना बाजार रोड- धरती चौक- हातमपुरा- हावरे गल्ली- नालबंद खुंट- रामचंद्र खुंट- किंग्स गेट हवेली- कोंड्या मामा चौक- फलटण चौकी.
मोहरम विसर्जन मिरवणूक (दि. 6)
कोठला-फलटन चौकी- बारा इमाम हवेली- मंगलगेट- आडतेबाजार- पिंजारगल्ली- पारशाखुंट- जुना कापड बाजार - देवेंद्र हॉटेल ख्रिस्त गल्ली-बुरुड गल्ली- जुना बाजार- पंचपीर चावडी- मनपा- दो बोटी चिरा मशीद- कोर्टाच्या मागील बाजूने- चौपाटी कारंजा- दिल्ली गेट- नीलक्रांती चौक- बालिकाश्रम रोड-बारा इमाम बारव व सावेडी गाव.
मिरवणूक मार्गावरील वाहतूक बंद
दि. 5 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून दि. 6 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वरील दोन्ही मिरवणूकमार्ग नो व्हेइकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र) असतील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. तसेच संबंधित मार्गांवर पोलिस अंमलदार नेमावेत व मिरवणूक मार्गावर बॅरीकेडिंग करावे, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे.
शहरात 439 जणांना प्रवेश मनाई
मोहरम 2025 च्या अनुषंगाने भारतीत नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 /2 प्रमाणे शहरात 439 जणांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत 103, तोफखाना पोलिस ठाण्यांतर्गत 162 आणि भिंगार कॅम्प पोलिस ठाणे अंतर्गत 174 असे 439 जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे.