पारनेर: विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय संघटनेच्या ताकदीविषयी विविध मार्गाने होत असलेली कुचंबना मनाला बोचत असल्याचे स्पष्ट करत तालुकाभारातील कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी, नव्याने झालेले पक्ष प्रवेश व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपण सर्वांनी एकसंघपणे गावागावांत पक्षबांधणी करून वाटचाल सुरू ठेवल्यास पुढील काळात राष्ट्रवादीही कुणापेक्षा कमी नसेल, असे ठाण विश्वास आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीची काँग्रेसची बैठक पारनेर येथील जिल्हा बँक सभागृहात पार पडली. आमदार दाते म्हणाले, माझ्या विजयात महायुतीच्या सर्वच घटकपक्षांचा असलेला सहभाग मी कधीही नाकारत नाही व नाकारणारही नाही. भविष्यात आपल्याला महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जायचे असून, महायुतीच्या वाटाघाटीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या जागा सर्वांच्या सामूहिक ताकदीने लढू आणि जिंकूही. पारनेरमध्ये महायुती अभेद्यच राहणार असल्याचे संकेतही यावेळी आमदार दाते यांनी दिले. (Latest Ahilyanagar News)
पंढरीनाथ उंडे व रमेश वरखडे यांना कार्याध्यक्ष, तर वंदना घोलप यांना महिला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याचवेळी शेतकरी नेते अनिल देठे यांसह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
नवीन पदाधिकारी जाहीर
सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष म्हणून अशोक खैरे, उपाध्यक्ष म्हणून संतोष शेलार तर सामाजिक न्याय विभाग युवकच्या अध्यक्षपदी आकाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. ओ.बी.सी. सेलच्या अध्यक्ष पदावर नितीन घोलप यांची, तर टाकळी ढोकेश्वर गट प्रमुखपदी देवराम मगर, टाकळी ढोकेश्वर गणप्रमुखपदी अक्षय गोरडे, भाळवणी गणप्रमुखपदी प्रकाश रोहोकले, निघोज गण अध्यक्षपदी वसंत ढवन तर सुपा गण अध्यक्षपदी सुरेश काळे यांची वर्णी लागली.
दावभट, साठे यांच्यावर जबाबदारी
जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी हरीश दावभट, जिल्हा संघटक पदाची जबाबदारी अप्पासाहेब साठे यांच्यावर तर संतोष सालके, अरुण चौधरी, प्रितेश पानमंद, अनिल मदगे, सुभाष ठाणगे, सतिश बागल यांच्यावर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. संतोष आवारी, अमोल रोकडे, भास्कर थोरात, अशोक डेरे यांची सरचिटणीस पदी, शरद गागरे खजिनदार पदी तर शंकर खैरे, अशोक जाधव, विजय दिवटे, राजू औचिते संघटक पदी तर विशाल साळवे यांचीही सचिव पदी नियुक्ती झाली.