आदिवासींनी ठोकले ‘भूमी अभिलेख’ला टाळे  Pudhari
अहिल्यानगर

Sangamner: आदिवासींनी ठोकले ‘भूमी अभिलेख’ला टाळे

निळवंडे प्रकल्पग्रस्तांच्या आदिवासींना दिलेल्या जमिनीबाबत प्रशासनाकडून दिशाभूल

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: निळवंडे प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या जमिनीचे कुठलेही मोजमाप नाही, त्याची नोंद नाही, त्या जमिनी नावावर नाही, या प्रश्नाकडे भूमी अभिलेख अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ काल शुक्रवारी (दि.20) भूमी अभिलेख कार्यालयावर अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने मोर्चा काढून टाळे ठोका आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, निळवंडे धरण प्रकल्पात अनेक आदिवासींच्या जमिनी गेल्या. त्या मोबदल्यात शासनाने प्रकल्पग्रस्तांना संगमनेर तालुक्यातील इतर ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या. मात्र अनेक वर्षे होऊनही त्या जमिनीचे कुठलेही मोजमाप करण्यात आले नाही. त्या जमिनीची कुठलीही नोंद करण्यात आली नाही. (Latest Ahilyanagar News)

त्या जमिनी नावावर झाल्या नाही. तहसीलदार, पोलिस , प्रांताधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाकडे याबाबत गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी संघटनेकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आदिवासी बांधवांची फसवणूक करत आहे.

या विरोधात आदिवासी संघटनेकडून शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आदिवासी बांधवांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांना याचा जाब विचारला. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ यावर वादावादी सुरू होती. मात्र यातून मार्ग निघू शकला नाही. यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनावेळी राजाभाऊ ठाकरे, बाळासाहेब मोरे, कारभारी गिरे, राजू गिरे, बाबुराव गिरे, राजू खडके आदिसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बहुसंख्या आदिवासी महिला भगिनी व बांधव उपस्थित होते. यावेळी बराच वेळ अधिकार्‍यांशी चर्चा होऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

जमिनी वाटल्या, पण ताबा अजुनही मिळेना!

शासनाने निळवंडे धरण प्रकल्पग्रस्त म्हणून काही आदिवासी कुटुंबांना जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कायमस्वरूपी नावे जमिनी दिलेल्या आहेत. मात्र 2007 सालापासून ते आजपर्यंत धरणग्रस्त मूळ मालकांना त्या जमिनी ताब्यात मिळालेल्या नाही.

तर काही ठिकाणी त्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी हाणामार्‍या होऊन एकमेकांवरती गुन्हे दाखल झाले आहे. अनेकदा आंदोलने मोर्चे काढूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज टाळे ठोको आंदोलन केल्याचे अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि. ना. उघाडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT